खाजगी वाहनांचा उरण डेपोला फटका
By Admin | Updated: September 24, 2015 00:25 IST2015-09-24T00:25:48+5:302015-09-24T00:25:48+5:30
प्रवाशांची सुरळीत वाहतूक करून नफा मिळवून देण्यासाठी एसटी गाड्या कंडक्टर, ड्रायव्हरची पुरेशी संख्या असतानाही खाजगी, निमशासकीय बस वाहतूकदारांशी वाढत्या स्पर्धेचा जबरदस्त फटका उरण एसटी डेपोला बसला आहे

खाजगी वाहनांचा उरण डेपोला फटका
उरण : प्रवाशांची सुरळीत वाहतूक करून नफा मिळवून देण्यासाठी एसटी गाड्या कंडक्टर, ड्रायव्हरची पुरेशी संख्या असतानाही खाजगी, निमशासकीय बस वाहतूकदारांशी वाढत्या स्पर्धेचा जबरदस्त फटका उरण एसटी डेपोला बसला आहे. मागील दोन वर्षांपासून ३ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करण्याची वेळ उरण डेपोवर येऊन ठेपली आहे.
उरण परिसरात प्रचंड प्रमाणात होत असलेल्या औद्योगिकीकरणामुळे उरण जागतिक व्यापारी केंद्र बनत चालले आहे. त्यामुळे जगाच्या नकाशावरही उरणला महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून स्थान प्राप्त होऊ लागले आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिसरात रोजगार आणि व्यापाराच्या निमित्ताने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. दररोज या परिसरातून सुमारे ७५ हजार प्रवासी ये-जा करतात. त्यापैकी २८ हजार एसटी, १५ हजार नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस तर खाजगी सुमो, स्कॉर्पिओ, ट्रॅक्स, स्टार बसेस आदी ३५० गाड्या दररोज ३५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. खाजगी गाड्यांच्या बेकादा वाहतुकीमुळे उरण एसटी डेपोला कोटयावधींचा तोटाच सहन करावा लागत आहे. उरण डेपोकडे ७८ जुनाट गाड्या आहेत. या गाड्यांच्या बळावर पाच मार्गावर ५५६ फेऱ्या मारते, दररोज २८ हजार प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. उरण डेपोच्या अडचणींचा फायदा घेत खाजगी गाड्या अवैध प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. २०१३-१४ या आर्थिक वर्षात डेपोला ३ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आगार व्यवस्थापक डी.एस.कुलकर्णी यांनी दिली.(वार्ताहर)