निगडे फणसकोंड येथे डेंग्यूची साथ

By Admin | Updated: May 9, 2016 02:06 IST2016-05-09T02:06:53+5:302016-05-09T02:06:53+5:30

तालुक्यातील निगडे फणसकोंड या दुर्गम वाडीमध्ये नऊ जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले असून, या सर्व रुग्णांवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

With dengue in Nigde Phanaskond | निगडे फणसकोंड येथे डेंग्यूची साथ

निगडे फणसकोंड येथे डेंग्यूची साथ

महाड : तालुक्यातील निगडे फणसकोंड या दुर्गम वाडीमध्ये नऊ जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले असून, या सर्व रुग्णांवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईतील रहिवासी असून, उन्हाळी सुटीमुळे व लग्नसराईनिमित्त हे सर्वजण आपल्या मूळ गावी आले होते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य पथके फणसकोंड येथे गेल्या तीन दिवसांपासून तैनात असून, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ई. सी. बिरादार यांनी दिली.
फणसकोंड येथे पाण्याची भीषण टंचाई असून, सुमारे ३० कुटुंबांची वाडी असलेल्या फणसकोंड येथे दर १५ दिवसांनी टँकरचे पाणी गावातील विहिरीत व प्रत्येक घरामधील प्लास्टिकच्या साठवण टाक्यांमध्ये साठवून ठेवले जाते. या साठवण टाक्यांतील पाण्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती झाल्याने वाडीवर डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाडीतील ६४ साठवण टाक्यांपैकी २८ टाक्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याची माहिती डॉ. बिरादार यांनी दिली. ४ एप्रिलला वाडीतील चौघांना ताप आल्यानंतर त्यांनी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली असता, हे नमुने एनएस १ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आणखी रुग्णांच्याही रक्ताची तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले.
गेल्या तीन दिवसांपासून आरोग्य विभागातर्फे निगड फणसकोंड येथे धुरीकरण केले जात असून साठवण टाक्या, विहिरींची स्वच्छता सुरू आहे. गावात जंतूनाकश फवारणी करण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गायकवाड यांनीही शनिवारी गावात भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)

Web Title: With dengue in Nigde Phanaskond