निगडे फणसेकोंड येथे डेंग्यूचे थैमान

By Admin | Updated: May 13, 2016 02:19 IST2016-05-13T02:19:38+5:302016-05-13T02:19:38+5:30

तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने

Dengue haemorrhage at Nigde Phansekond | निगडे फणसेकोंड येथे डेंग्यूचे थैमान

निगडे फणसेकोंड येथे डेंग्यूचे थैमान

महाड : तालुक्यातील निगडे फणसेकोंड या दुर्गम ठिकाणच्या वाडीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले डेंग्यूचे थैमान थांबलेले नाही. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यूची लागण होण्याच्या भीतीने स्थानिक ग्रामस्थांनी तालुक्यातील नातेवाइकांकडे स्थलांतर केल्याने फणसेकोंड येथे सध्या स्मशान शांतता पसरल्याचे दिसून येत आहे. साठवण टाक्यांमध्ये साठवलेल्या पिंपामधील पाण्यामुळे तसेच कोंडावरील विहिरीतील पाण्यामुळे या ठिकाणी डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून बळीराम मोरे, ज्ञानेश्वर चौधरी या ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
निगड गावच्या १३ वाड्यांना एकाच जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ३० ते ३५ उंबरठा असलेल्या फणसेकोंड येथील बहुतांशी ग्रामस्थ मुंबईत नोकरी व्यवसायानिमित्त राहतात. आठ दहा दिवसांपूर्वी या वाडीत सुरुवातीला डेंग्यूची लागण झालेले सात रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यावेळी त्या ठिकाणी धुरीकरण, जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तर प्रत्येक घराबाहेर पाणी साठवणासाठी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिंपापैकी बहुतांशी पिंपातील पाण्यात डेंग्यूच्या अळ्या असल्याचे निष्पन्न झाले होते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इ. सी. बिरादार यांनी डेंग्यूची लागण नियंत्रणात असल्याचे सांगितले असले तरीही प्रत्यक्षात दिवसेंदिवस हा फैलाव वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री फणसेकोंड येथील डेंग्यूची लागण झालेल्या आणखी नऊ जणांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल के ले आहे. आणखी काही ग्रामस्थांना ही लागण झाली आहे. मात्र स्थानिक पातळीवर व्यवस्थित उपचार केले जात नसल्याने यापैकी काही जण उपचारासाठी मुंबईला गेल्याची माहिती नारायण फणसे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप हे दीर्घकालीन रजेवर गेल्याने बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधांमुळे डेंग्यूच्या रुग्णांना मुंबईत उपचारासाठी जावे लागत आहे. तसेच पाणीटंचाई असल्याने टँकर तरी पाठवण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे केली आहे.

Web Title: Dengue haemorrhage at Nigde Phansekond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.