मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:26 AM2021-04-01T01:26:38+5:302021-04-01T01:27:13+5:30

fishermen news : खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत.

Decreased fish arrivals have made fishermen anxious, cost more and fish less | मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी

मासळीची आवक घटल्याने मच्छीमार झाले हवालदिल, खर्च अधिक आणि मासळी कमी

googlenewsNext

मुरुड : खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. खोल समुद्रात आठ-आठ तास प्रवास करून मासळी पकडण्यासाठी मच्छीमार जात आहेत. कारण जवळपास मासळी मिळत नाही. त्यामुळे समुद्रात खूप मोठे अंतर कापावे लागते. यासाठी एका ट्रीपसाठी किमान ८० हजार रुपयांचे डिझेल संपवावे लागत आहे. खर्च जास्त होतो व मासळी मात्र तुटपुंजी मिळत असल्याने मच्छीमार कर्जबाजारी होत आहेत. 

तुटपुंजी मासळी मिळत असल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना ती खरेदी करणे अशक्य बाब बनली आहे. मासळीचे भाव वाढल्याने आता सर्वसामान्य माणूस शाकाहारी बनत चालला असून मासळीची जागा आता भाजीपाल्याने घेतली असल्याचे दिसत आहे. मागील तीन महिन्यांपासून मासळी खोल समुद्रात निघून गेल्याने मासळीही तुटपुंजी मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मच्छीमारांची उपजीविका ही मुख्यत्वे मासेमारीवरच अवलंबून आहे. मासळी बाजारात आवक घटल्याने व मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने मासळीचे दर प्रचंड वाढत असून ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

मच्छीमार समाजाची मासळीची आवक घटल्याने डिझेल, बर्फ व होडीवरील माणसांचा पगार सुटत नसला तरी मासेमारी केल्याशिवाय पर्याय नसल्याने पारंपरिक धंदा सुरू ठेवणे क्रमप्राप्त असल्याची चर्चा नाखवा व तांडेल लोकांमध्ये ऐकावयास मिळते. एलईडी मासेमारीचा शासनस्तरावर बंदोबस्त केला तरच पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणारा कोळी समाज तरू शकेल अशी अपेक्षा या समाजाकडून व्यक्त होत आहे. 

हा वैश्विक तापमानाचा तर परिणाम नसावा, यासंदर्भात जय भवानी मच्छीमार संघाचे चेअरमन महेंद्र गार्डी यांना विचारले असता ते म्हणाले की, खोल समुद्रात एलईडी पध्दतीने मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जात आहे. वस्तुतः शासनाने त्यावर बंदी आणली असताना अशी मासेमारी होतेच कशी? असा सवाल उपस्थित करत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे आर्थिक संकटात आले आहेत. 

 याशिवाय तेल कंपन्यांच्या तेलविहिरी शोधण्याचा सर्व्हेदेखील मासेमारी व्यवसायात अडथळा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुमारे दोन वर्षांपासून डिझेल परतावा शासनाकडून येणे बाकी असल्याने मच्छीमार सोसायट्यादेखील अडचणीत आलेल्या आहेत. तसेच सध्या हवामानात कमालीचा बद्दल झालेला आहे. समुद्रात धुकेसुद्धा वाढले असून समोरची बोटसुद्धा दिसत नाही. अचानकपणे मासळी कमी झाल्याने सर्व मोठ्या बोटी किनाऱ्याला साकारण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली आहे.

Web Title: Decreased fish arrivals have made fishermen anxious, cost more and fish less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.