१५ उमेदवारांच्या अर्ज बादचा निर्णय कायम

By Admin | Updated: April 22, 2017 02:51 IST2017-04-22T02:51:06+5:302017-04-22T02:51:06+5:30

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत, निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडून फेटाळण्यात आलेल्या

The decision of the 15 candidates for the application has been fixed | १५ उमेदवारांच्या अर्ज बादचा निर्णय कायम

१५ उमेदवारांच्या अर्ज बादचा निर्णय कायम

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत, निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडून फेटाळण्यात आलेल्या १५ उमेदवारी अर्जाबाबत दाखल अपिलाची सुनावणी जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका यांच्यासमोर झाली. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांंनी दिलेला निर्णय खोडका यांनी कायम ठेवला आहे. परिणामी या १५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून विविध पतसंस्थांतील गणमान्य मान्यवरांना मोठा धक्का बसला आहे.
उमेदवारी अर्ज बाद झाल्याने या १५ जणांमध्ये, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे विद्यमान अध्यक्ष गिरीश तुळपुळे, विद्यमान उपाध्यक्ष बाबूराव भोनकर, रायगड जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, जि.प. सदस्य किशोर जैन, विजय भिडे, नीला मेहता, अशोक प्रधान, उदय करमरकर, विलास चौलकर, दिनकर गीत, ललितकुमार जैन, संतोष हिचके, विजय कुंटे, श्रीकांत चांदोरकर आणि अमित ओझे यांचा समावेश होता. विद्यमान अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघ मर्यादित अलिबाग या संस्थेच्या संचालक मंडळाची ही चौथी निवडणूक आहे. दर पाच वर्षांनी होणारी ही निवडणूक यावेळी सात वर्षानंतर होत आहे. यापूर्वी झालेल्या बहुतांश निवडणुका बिनविरोध झाल्याने चर्चेत आल्या नाहीत. मात्र यावेळी विद्यमान अध्यक्षांसह १५ उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने, ती चर्चेत आली आहे.
यावेळच्या निवडणुकीकरिता विद्यमान अध्यक्ष गिरीश तुळपुळे गटातर्फे २१ पैकी १९ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर प्रा. उदय जोशी यांच्या गटातर्फे २ अतिरिक्त अर्जांसह २१ अर्ज एकूण ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. विद्यमान अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांच्या विरुध्द अमित ओझे यांचा अर्ज दाखल होता. एकूण ३८ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांचे अर्ज ११ एप्रिल रोजी झालेल्या छाननीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधकांनी फेटाळून लावले
होते.
बाद झालेल्या १५ अर्जांपैकी १४ अर्ज हे तुळपुळे गटाचे आणि प्रा.उदय जोशी गटाच्या अमित ओझे यांचा एक अर्ज आहे. उमेदवाराने ज्या मतदार संघामध्ये त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्याच मतदार संघातील त्या उमेदवाराचा सूचक व अनुमोदक असला पाहिजे अशी तरतूद आहे. मात्र त्या पंधराही उमेदवारांचे सूचक व अनुमोदक त्यांनी ज्या मतदार संघात त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्या मतदार संघातील नाहीत, या कारणास्तव या १५ जणांचे उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले होते.
(विशेष प्रतिनिधी)

कायद्याचा चुकीचा अर्थ लावला
जात असल्याचा दावा
पतसंस्थांच्या ठेवीच्या रकमेनुसार मतदारसंघांची रचना असते. मोठ्या ठेवींच्या मतदारसंघात मोजक्याच पतसंस्था येतात. ६० कोटींच्या वरील ठेवीच्या मतदारसंघात केवळ तीन पतसंस्था आहेत. अशावेळी एकच उमेदवार उभा राहिला तर त्याच मतदारसंघातील सूचक अनुमोदक मिळेल.
मात्र लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. अशा वेळी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी निवडणूक लढविल्यास त्याच मतदारसंघातील सूचक, अनुमोदक मिळणे शक्यच होणार नाही. इथेही असेच झाले.
कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे नमूद करून तुळपुळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. सुनावणीअंती जिल्हा उपनिबंधकांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचाच निर्णय कायम करुन, १५ उमेदवारी अर्ज बाद हा निर्णय अबाधित राखला आहे.

२६ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
आपल्या पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ते या निवडणुकीत आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही. या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार आहोत असे गिरीश तुळपुळे यांनी स्पष्ट केले आहे. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २६ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

Web Title: The decision of the 15 candidates for the application has been fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.