स्थलांतराच्या नोटिसीमुळे दासगाव ग्रामस्थ आक्रमक

By Admin | Updated: June 6, 2016 01:32 IST2016-06-06T01:32:50+5:302016-06-06T01:32:50+5:30

महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक

Dasgaon Village Invader Due to Migrant Notification | स्थलांतराच्या नोटिसीमुळे दासगाव ग्रामस्थ आक्रमक

स्थलांतराच्या नोटिसीमुळे दासगाव ग्रामस्थ आक्रमक

सिकंदर अनवारे,  दासगांव
महाड तालुक्यात २००५ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होवून ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्याचप्रमाणे दासगावमध्ये दरड कोसळून अनेक घरे जमीनदोस्त होवून ४८ जणांचा मृत्यू झाला होता. दरडग्रस्त विभाग दासगाव बंदर रोड व भोईवाडा परिसरात या ठिकाणी आजही अनेक कुटुंबांचे वास्तव्य आहे. यंदासाठी हवामान खात्याने दर्शविलेला जास्त होणाऱ्या पावसाचा अंदाज व भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणाप्रमाणे पुन्हा २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीप्रमाणे यंदाही अशाच पद्धतीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा याच ठिकाणी पुराच्या पाण्याची शक्यता व दरडीचा धोका पाहता दासगांव भोईवाडा परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणाहून स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत, मात्र त्यांनी स्वत:हून राहण्याचा बंदोबस्त करावा, यापुढे स्थलांतर झाले नाही तर प्रशासन जबाबदार राहणार नाही असे नोटिसीत नमूद असल्याने दासगांवमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
२००५ साली महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला होता. ठिकठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. मात्र त्यावेळेपासून आजतागायत गेली १० वर्षे त्याच ठिकाणी पुन्हा दरडी कोसळण्याची संभावना कायम आहे. २००५ नंतर १० वर्षे महसूल विभाग त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना पावसाळा जवळ आल्यानंतर स्थलांतर होण्याच्या नोटिसा देवून आपली जबाबदारी पूर्ण करत आली आहे. आठवडाभरापूर्वी महाडमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे महाराष्ट्र राज्य युनिटचे डॉ. मकरंद बोडस यांच्या वतीने एक बैठक आयोजित के ली होती. या बैठकीत प्रांताधिकारी यांच्या वतीने मार्गदर्शन करत धोका असणाऱ्या ग्रामस्थांना पावसाळापूर्वी स्थलांतर करण्याचे आदेश खालच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. स्थलांतर होत नसतील तर शासन जबरदस्तीने खाली करेल असेही सांगण्यात आले. मात्र अद्यापही त्याचा परिणाम दरडीच्या छायेत असणाऱ्या एकाही ग्रामस्थावर झाला नाही.
दोन दिवसांपूर्वी तलाठ्याची सही असलेले संभाव्य दरड व पुराचा धोका असलेल्या दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमधील घरांना नोटिसी देण्यात आल्यानंतर दासगांवमध्ये महसूल विभागाविरोधात संतापाची लाट उसळली. कारण प्रशासनाने या नोटिसीमध्ये २००५ प्रमाणे नैसर्गिक आपत्ती २०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, पूर येणे यासारखे अनेक धोके संभावू शकतात, असे नमूद केले आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह निवाऱ्याचे साहित्य घेवून गुरेढोरे असल्यास त्याची सुरक्षितता व्यवस्था करून आपण स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. स्थलांतरित न झाल्यास, काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील, अशी नोटीस देण्यात येवून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून हात वर केल्याने दासगांवमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

दासगांव भोईवाडा परिसरात जवळपास २०० हून अधिक घरे आहेत. दरडीचा व पुराचा मोठा धोका आहे. मात्र गेली १० वर्षे शासन आमच्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याच समस्यांवर लक्ष देत नाही. गेली १० वर्षे दरड कोसळल्यानंतर दर पावसाळ्यापूर्वी नोटिसी देवून आपली जबाबदारी टाळत आली आहे.
- पांडुरंग निवाते, ग्रामस्थ, दासगांव

Web Title: Dasgaon Village Invader Due to Migrant Notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.