बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

By Admin | Updated: April 19, 2017 00:47 IST2017-04-19T00:47:04+5:302017-04-19T00:47:04+5:30

आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे.

Damage to Mango Product due to Bandguol " | बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

बांडगुळांमुळे आंबा उत्पादनाला फटका"

जयंत धुळप , अलिबाग
आंबा हे कोकणातील महत्त्वाचे फळ पीक आहे. कोकण विभागात १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड के लेलीआहे. त्यापैकी सुमारे ४० ते ५० टक्के जुनी व अवाढव्य वाढलेली झाडे आहेत, त्याचबरोबर या झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे कीडरोग आणि बांडगुळे देखील वाढत आहेत. आंबा कलमांचे बांडगुळापासून संरक्षण केले नाही तर कलमांची अपेक्षित वाढ होत नाही. तसेच बागेवरील किडींचा देखील वेळीच बंदोबस्त केला नाही तर हातातोंडाशी आलेले आंबा पीक जाण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी आंबा उत्पादनवाढीसाठी बांडगूळ निर्मूलन अत्यावश्यक असल्याचा सल्ला अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप ढवळे यांनी दिला आहे.
आंबा पिकावर जवळपास वेगवेगळ्या १८५ किडी आढळून आल्या असल्या तरी यापैकी केवळ १० ते १२ किडी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये तुडतुडे, पिठ्या ढेकूण, खोडकिडा शेंडा पोखरणारी अळी,फळमाशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत १ डिसेंबर २०१६ पासून ‘आंबा पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ (हॉर्टसॅप)सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे नियमित निरीक्षणे घेऊन कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी सल्ला देण्याचे काम करण्यात येत आहे.
बांडगूळ म्हणजे आंब्याच्या झाडावर वाढणारी सपुष्प अर्धपरोपजीवी वनस्पती आहे. ही अर्धपरोपजीवी वनस्पती असल्याप्रमाणेच अन्य द्विदल, बहूवर्षायू फळपिके आणि जंगली झाडांवर परिणाम करते. बांडगुळाची वाढ आंब्याच्या फांदीवर झाल्याने आंब्याच्या झाडाने मुळांवाटे शोषण केलेले तयार अन्नरस बांडगुळ वाढीसाठी वापरले जातात. परिणामी मुख्य झाडाची वाढ मंदावते. झाडावर अनेक बांडगुळे आल्याने आंब्याचे झाड कमकुवत होते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
बांडगुळाची वाढ झाडावर झाल्यावर बांडगुळाला फुले आणि फळे मोठ्या प्रमाणात येतात. ही फळे गोड आणि चिकट असतात. या फळातील बिया पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत प्रसार पावतात आणि फांदीच्या बेचक्यात आणि पृष्ठभागावरील बिया पुढील पावसाळी हंगामात अंकूरण पावतात आणि नवीन बांडगुळांची वाढ होते.
आंब्याप्रमाणेच काजू, सीताफळ, पपनस, लिंबू, पेरू, बोर या फळपिकांवर तसेच साग,आसाणा, शेवर, आपटा, बाभूळ, बेल, वड, पिंपळ, शिवण, कडिपत्ता, करंज, रिठा, बेहेडा, अर्जुन आणि अन्य अनेक जंगली झाडांवर बांडगूळ नैसर्गिकरीत्या वाढते आणि त्याचा प्रसार फळबागांत पक्ष्यांमार्फत होतो.
बागेभोवती वाढणाऱ्या जंगली झाडांवरील बांडगुळे वेळोवेळी नष्ट करणे अनिवार्य आहे. अमर कोयत्याच्या साहाय्याने आंब्यावरील आणि अन्य फळ पिकावरील बांडगुळे काढून टाकणे आवश्यक आहे. तरच आंब्यावर याचा परिणाम होणार नाही.

बांडगुळांच्या निर्मूलनासाठी जागरूकता
कोकणातील आंब्याच्या लागवडीखालील १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३० हजार क्षेत्रावरील आंब्याची कलमे ही नवीन आहेत. परिणामी त्यावर बांडगुळाचा प्रादुर्भाव नाही.
कोकणातील एकूण आंबा क्षेत्रातील ५ ते १० टक्के क्षेत्रातील दुर्लक्षित आंबा झाडांवर बांडगुळांची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कोकणातील ६० टक्के आंबा बागायत ही ‘कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग’या पध्दतीत आहे. केवळ ४० टक्के आंबा बागायतदार हे स्वत: मालक आहेत.
परिणामी आंबा उत्पादनाकरिता या दोन्ही पद्धतीत बांडगूळ निर्मूलनाची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली जाते, अशी माहिती कोकणातील नामांकित आंबा संशोधक गणपतीपुळे येथील आंबा उत्पादक कृतिशील शेतकरी डॉ.विवेक भिडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

Web Title: Damage to Mango Product due to Bandguol "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.