कर्जत तालुक्यात चक्रीवादळाने पाच कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:53 IST2020-06-08T00:52:54+5:302020-06-08T00:53:18+5:30
जनजीवन विस्कळीत : ६२१५ शेतकऱ्यांचे तर २५० शासकीय मालमत्तांचे नुकसान

कर्जत तालुक्यात चक्रीवादळाने पाच कोटींचे नुकसान
विजय मांडे
कर्जत : निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची घरे, शेती, बागा आणि शासकीय मालमत्तांचे साधारण पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळाने ६२१५ शेतकºयांचे तर २५० शासकीय मालमत्तांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.
३ जून रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यात तब्बल चार तास धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठा करणारे महावितरणचे २०० हून अधिक खांब कोसळले आहेत. तालुक्यातील शेतकºयांच्या राहत्या घरांचे आणि शेती, बागांचे वादळाने मोठे नुकसान केले आहे. त्यात ३१९४ पक्क्या घरांवरील छपरे उडून गेली असून कच्च्या स्वरूपात असलेल्या २६६३ घरांची कौले आणि झापे उडून गेले असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
झोपडी स्वरूपात असलेल्या ३५५ घरांचे वादळाने नुकसान केले असून आजच्या तारखेला छपरे उडून गेलेल्या साधारण ३२१५ घरांचे पंचनामे महसूल विभागाने पूर्ण केले आहेत तर ४१२ शेतकºयांच्या बागायती शेतपिकाचे वादळाने नुकसान केले असून त्या नुकसानग्रस्त १५८ शेतीचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहेत.
तालुक्यातील शासकीय मालमत्तेचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात ग्रामपंचायत कार्यालये, जिल्हा परिषदेचे विश्रामगृह, अंगणवाडी इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक शाळा यांचा समावेश असून ही सर्व नुकसानीची आकडेवारी साधारण पाच कोटी रुपयांची असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
खासगी मालमतांचे झालेले नुकसान हे शासनाच्या निकषाप्रमाणे निधी प्राप्त झाल्यानंतर वाटप केले जाणार आहे.
पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर
च्महसूल विभागाला पंचनामे करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कर्जत पंचायत समिती विभागाकडून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी विभागाकडून कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांची मदत मिळत आहे.
च्वादळाने नुकसान केलेल्या सर्व ६२१५ घरांचे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून अर्धे पंचनामे करण्यात शासनाला यश आले आहे, अशी माहिती कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,
कर्जत पंचायत समितीचे
प्रभारी गटविकास अधिकारी
पी.टी. रजपूत, तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी दिली आहे.