कर्नाळा अभयारण्य परिसरातील ध्वनिप्रदूषणाला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:31 IST2021-01-03T00:31:21+5:302021-01-03T00:31:39+5:30
रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांना धोका निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत पार पडली होती.

कर्नाळा अभयारण्य परिसरातील ध्वनिप्रदूषणाला आळा
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्याचा भाग बाधित झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात हा भाग येत असून या ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वाला आल्याने वाहनांची वर्दळ लक्षात घेता होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे नॉईस बॅरिअर्स (ध्वनिरोधक) यंत्रणा बसविण्यास सुरुवात केली आहे.
रुंदीकरणात कर्नाळा अभयारण्यातील वन्यजीवांना धोका निर्माण होणार असल्याने याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी राज्य व राष्ट्रीय वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २०१५ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत पार पडली होती. या बैठकीत कर्नाळा अभयारण्यातील महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर वाहनांचा वेग वाढणार असल्याचे लक्षात घेता विविध उपाययोजना राबविण्याच्या अटी व शर्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घालण्यात आल्या होत्या. यामधील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्याची महत्त्वाची अट घातली होती. यानुसार ध्वनिरोधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अभयारण्याच्या दीड किलोमीटर परिसरात हे बॅरिअर्स बसविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी हेमंत फेगडे यांनी दिली.
तसेच, अभयारण्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. याकरिता या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. याव्यतिरिक्त वाहनांची गती कमी करण्यासाठी रम्बलर्स, माकडांकरिता मंकी लँडर उभारण्याच्या सूचना अभयारण्य प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केल्या आहेत.
ध्वनिरोधक यंत्रणेमुळे अभयारण्यातील वन्यजीवांना होणारा ध्वनिप्रदूषणाचा त्रास कमी होणार आहे. या बॅरिअर्सची उंची दीड मीटर असून ती दोन मीटरपर्यंत करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करणार आहोत.
- पी. पी. चव्हाण, कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी