शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी
By Admin | Updated: June 15, 2016 01:05 IST2016-06-15T01:05:58+5:302016-06-15T01:05:58+5:30
दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहेत. असंख्य नवीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असल्याने गणवेश, रेनकोट, छत्र्या

शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी
कर्जत : दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहेत. असंख्य नवीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असल्याने गणवेश, रेनकोट, छत्र्या घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची एकच गर्दी गेल्या तीन-चार दिवसांपासून होत आहे, तर मंगळवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
१५ जून रोजी शाळा सुरु होत आहेत. काही शाळा गेल्याच आठवड्यात सुरु झाल्या. मात्र बुधवारी मोठ्या संख्येने शाळा सुरु होत असल्याने शनिवार व रविवारी पालकांनी शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जतच्या बाजारपेठेत एकच गर्दी केली आहे. कर्जत शहराबरोबरच ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.
अगदी खेडोपाडी सेमी इंग्लिशच्या शाळा सुरु करण्यात आल्या असल्याने शाळांचे तयार गणवेश खरेदी करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची मंगळवारी गर्दी बाजारात पहावयास मिळाली. (वार्ताहर)
खरेदीसाठी विद्यार्थी - पालकांची धावपळ
कार्लेखिंड : उन्हाळी सुटी संपत आल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा बुधवारी सुरू होत आहेत, तर काही शाळा अगोदर चालू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना शालोपयोगी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी स्टेशनरीच्या दुकानात विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. नवीन वर्गाच्या वह्या, पुस्तके खरेदी करणे हे गरजेचे असते.
लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन आकर्षक आकारातील कंपास, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग बाजारात आलेल्या दिसत आहेत. लवकरच चालू होणाऱ्या पावसाळ्यात संरक्षणासाठी छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल, शालेय गणवेशसुद्धा खरेदी करताना बच्चे कंपनी दंग आहे. महागाईच्या विळख्यात सापडलेले आई-वडीलसुद्धा आनंदाने मुलांसाठी वस्तू खरेदी करत आहेत.