न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या
By Admin | Updated: April 27, 2017 00:04 IST2017-04-27T00:04:51+5:302017-04-27T00:04:51+5:30
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या
अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते.
या आधी १५ उमेदवारांनी अलिबागच्या सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. दोन्ही यंत्रणांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.
रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ७ मे रोजी पार पडणार आहे. एकूण २१ सदस्य या महासंघात निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या नुकतीच पार पडली होती. गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक हे वेगवेगळ्या मतदार संघातील दिले होते. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे.
महासंघाच्या उपविधी १:१ नुसार निवडणुकीकरिता संचालक मंडळाचे जे विभाग केलेले आहेत. ते विभाग म्हणजे मतदार संघ नाहीत, तसेच निवडून द्यावयाच्या सर्व जागांकरिता प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये सूचक, अनुमोदक वेगळ्या मतदार संघातील आहेत या कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आणि सदरचा निर्णय कायम ठेवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निणर्य चुकीचा आहे असा मुद्दा याचिकाकत्यांच्या वकिलांनी याचिकेत केला होता.
अलिबागचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी दिलेला निर्णय योग्य तसेच सहकारी कायदा आणि निवडणूक नियमांना धरून आहे, असा युक्तिवाद सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य १४ जणांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सी.जी. गावणेकर यांनी काम पाहिले, तर सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ संपतराव पवार, मुग्धा पाटील यांनी काम पाहिले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून गिरीश तुळपुळे गटाचे महासंघावर असलेले वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)