CoronaVirus News in Raigad : मुंबईतून गावी आलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 00:13 IST2020-05-22T00:13:38+5:302020-05-22T00:13:55+5:30
या दाम्पत्यावर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते.

CoronaVirus News in Raigad : मुंबईतून गावी आलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल
महाड : मुंबईत गर्भवती पत्नीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार न घेता तसेच होम क्वारंटाइन न करता मुंबईतून दुचाकीने महाड तालुक्यातील करमर हे गाव गाठणाऱ्या या दाम्पत्यावर अखेर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन कोरोना व साथरोग अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
हे दाम्पत्य महाड तालुक्यातील करमर येथील असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहेत. या दाम्पत्यावर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांना अधिक उपचारांची गरज असल्याने १८ मेला सोमय्या रुग्णालयातून के.ई.एम, नायर किंवा सायन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घ्यावेत, असे सांगत त्यांना सोमय्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता; परंतु या दाम्पत्याने तसे न करता दुचाकीने मुंबईतून थेट आपले महाड तालुक्यातील गाव गाठले. हा प्रकार करमर ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर आरोग्य व पोलीस यंत्रणा जागी झाली. पती व गर्भवती पत्नीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता या दोघांना महाड ग्रामीण रुग्णालयाच्या कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.