CoronaVirus News: जिल्हा रुग्णालयाला मिळाले २० आयसीयू बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:48 IST2020-10-04T23:47:39+5:302020-10-04T23:48:04+5:30
CoronaVirus Raigad News: आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन; ९७ बेड्सपैकी ५३ बेड्समध्ये ऑक्सिजनची व्यवस्था

CoronaVirus News: जिल्हा रुग्णालयाला मिळाले २० आयसीयू बेड
अलिबाग : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनांसह सोईसुविधांमध्ये वाढ करून जिल्हा रुग्णालय सशक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. रुग्णालयात अद्ययावत केलेल्या २० आयसीयू, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, जिल्ह्यात रुग्णांची वाढत चाललेली संख्या चिंतित करणारी होती. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे.
हेक्झावरे या कंपनीने सीएसआर फंडातून ९७ आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देत आहे. यापैकी आयसीयूमधील आक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे काम पूर्णत्वास आले आहे. या विभागात पत्रकार, महसूल आणि पोलीस विभागासाठी १ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोनाची अति तीव्र लक्षणे असणाºया रुग्णांना आक्सिजनची अवश्यकता भासत असल्याची माहिती मुंबई येथील हेक्झावरे कंपनीला मिळाली. त्यानुसार, या कंपनीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधत मदतीचा हात पुढे केला.
या कंपनीने जिल्हा रुग्णालयाची तत्काळ पहाणी करून आपल्या सीएसआर फंडातून जिल्हा रुग्णालयातील आॅक्सिजन पॅनल तयार केले, तसेच ९७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ४४ बेड आयसीयू बेड असणार आहेत, तर ५३ बेड हे आॅक्सिजन व्यवस्थेने परिपूर्ण व अद्यावत असणार आहेत. त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, हेक्झावरे कंपनीच्या सीएसआर विभाग प्रमुख अंबरीन नेमन, कॅप्टन राहुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आश्रफ घट्टे आदी उपस्थित होते.
सहा डॉक्टर, १० सिस्टरचा समावेश
नव्याने सुरु करण्यात आलेल्या या आय.सी.वार्डमध्ये सहा डॉक्टर्स, १० सिस्टर, ०८ सफाई कर्मचारी असा सह अधिकारी व १८ कर्मचारी असणार आहेत. अलिबागमधील डॉक्टर विनित शिंदेंसह इतर खाजगी प्रॅक्ट्रीस करणारे डॉक्टरांचाही
समावेश आहे.