भारतीय नागरिकत्वाची ओढ
By Admin | Updated: January 5, 2016 02:05 IST2016-01-05T02:05:59+5:302016-01-05T02:05:59+5:30
जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले

भारतीय नागरिकत्वाची ओढ
आविष्कार देसाई, अलिबाग
जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानातील नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्थान, श्रीलंका, युक्रेन, नेपाळ, फिलिपाइन्स, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना भारताच्या नागरीकत्वाची ओढ लागली आहे.
गेल्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीतील हे प्रस्ताव असून, एकच प्रकरण रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. तोही प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात येत्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधींना वाव आहे. जिल्ह्यातून परदेशामध्ये नोकरी-धंद्यानिमित्त काही प्रमाणात स्थलांतर झाले आहे. मात्र जिल्ह्यात होऊ घातलेली डेव्हलपमेंट आता सर्वांच्याच नजरेपासून लपून राहिलेली नाही. भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी २२ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले होते. त्यातील एक प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे. या सर्व प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने भारत देशाच्या फाळणीच्या वेळी काही जण हे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांच्यासह त्यांच्या पिढीला आता भारत देशाची ओढ लागली आहे. मोहनदास कटारीया आणि रंजना कटारीया यांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आले आहेत. तेथून ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अर्जदाराचा पती अथवा पत्नी हे भारतीय नागरिकत्व धारण केलेले आहेत. त्यामुळे लग्नानंतर ते आता भारताचे नागरिकत्व प्राप्त करून येथेच राहू इच्छितात. युक्रेनच्या स्नेहा गोयल, जेसिका गोयल, इराणी गोयल यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याआधी कायद्यानुसार त्यांना पूर्वीचे नागरिकत्व रद्द करणे गरजेचे आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. धार्मिकतेच्या कट्टरवादाचा प्रभाव येथे कमी आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात शांतता आहे. नोकरी- धंद्याची कवाडे येथे अपकमिंग प्रोजेक्टमुळे खुली होणार आहेत. त्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.