माथेरानमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
By Admin | Updated: October 27, 2016 03:24 IST2016-10-27T03:24:27+5:302016-10-27T03:24:27+5:30
माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढू लागला असून मागील अनेक वर्षे माथेरानमधील राजकीय पटलावर विरोधक असलेले दोन्ही काँग्रेस यांची आघाडी

माथेरानमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र
माथेरान : माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या निवडणुकीला रंग चढू लागला असून मागील अनेक वर्षे माथेरानमधील राजकीय पटलावर विरोधक असलेले दोन्ही काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. उभय काँग्रेसच्या वतीने आघाडी झाल्याचे जाहीर करण्यात आले. माथेरानच्या विकासासाठी ही आघाडी झाली असून वरिष्ठांनी या आघाडीला पाठिंबा दिला असून सर्व १७ जागांवर विजयी होण्याचा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
२७ नोव्हेंबर माथेरान गिरीस्थान नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. निवडणुकीविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न बुधवारी माथेरानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संतोष केणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजय सावंत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज खेडकर, माथेरानच्या नगराध्यक्षा वंदना शिंदे,राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष शुभांगी कळंबे, अश्वपाल संघटनेच्या नेत्या आशा कदम आदी प्रमुख उपस्थित होते. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक करताना संतोष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या राज्य पार्लमेंट्री बोर्डाने मान्यता दिल्यानंतर दोन्ही काँग्रेसची आघाडी करण्यात आल्याची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज खेडकर यांनी शहराच्या विकासाच्या विषयावर आणि माथेरानला पर्यटनदृष्ट्या जागतिक पातळीवर नेण्यासाठी विविध प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेत काँग्रेसबरोबर नैसर्गिक आघाडी करण्याचा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी ठेवला होता. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते केडर बेस कार्यकर्ते असल्याने कार्यकर्त्यांनी ठरविले म्हणून आघाडी केली असल्याचे सावंत यांनी स्पष्ट के ले.
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संतोष केणे यांनी आघाडीमध्ये राष्ट्रवादी १० जागा तर काँग्रेस पक्ष ७ जागा लढणार असून काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार सुरेश लाड निश्चित करणार असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक संतोष केणे हे निश्चित करणार आहेत. दोन्ही पक्षाचे उमेदवार २७ आॅक्टोबर रोजी एका प्रेस नोटद्वारे जाहीर केले जातील, अशी माहिती अजय सावंत यांनी दिली. (वार्ताहर)
आज उमेदवार निश्चित
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संतोष केणे यांनी आघाडीमध्ये राष्ट्रवादी १० जागा तर काँग्रेस पक्ष ७ जागा लढणार असून काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आ. सुरेश लाड निश्चित करणार असून काँग्रेसचे उमेदवार संतोष केणे हे निश्चित करणार आहेत. दोन्ही पक्षाचे उमेदवार २७ आॅक्टोबर रोजी एका प्रेस नोटद्वारे जाहीर केले जातील, अशी माहिती अजय सावंत यांनी दिली.