राष्ट्रीय एकात्मतेसाठी सलग १००० तास गायनाचा उपक्रम खारघरमध्ये आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:35 IST2019-12-07T23:35:29+5:302019-12-07T23:35:34+5:30
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद

राष्ट्रीय एकात्मतेसाठी सलग १००० तास गायनाचा उपक्रम खारघरमध्ये आयोजन
-वैभव गायकर
पनवेल : राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘स्टॉप ग्लोबल वार्मिंग’, ‘कैपस विथ हेल्मेट’, ‘सेव्ह वॉटर’, ‘रक्तदान’ या ज्वलंत सामाजिक विषयांच्या प्रचारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये हा उपक्रम साकारला जात आहे. सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तासांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर १००० तासांचा गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड हा नवा विक्रम साकारण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात देशभरातील विविध कानाकोपऱ्यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. ७ रोजीपर्यंत सुमारे ५५० तास सलग गायनाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ओरिसा, पुणे, गुजरात, राजस्थान आदीसह वेगवेगळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमात ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होणार असून मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीतगीतांचा सहभाग आहे.
गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्रमाची नोंद चीनच्या नावावर आहे. या विक्रमाला मागे टाकण्यासंदर्भात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी चार कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक ठेवण्यात आलेले आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे भारताच्या नावावर विक्रमाची नोंद होणार आहे.
उपक्रमांतर्गत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘स्टॉप ग्लोबल वार्मिंग’, ‘कैपस विथ हेल्मेट’, ‘सेव्ह वॉटर’, ‘रक्तदान’ यासंदर्भातही जनजागृती केली जात आहे, त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत. या उपक्रमाचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत. विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भेट देत आहेत.
सुमो ५५० तासांच्या गायनाचा टप्पा पूर्ण
७ डिसेंबरपर्यंत सुमारे ५५० तास सलग गायनाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश ओरिसा, पुणे, गुजरात, राजस्थान आदीसह वेगवेगळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. आतापर्यंत ६५० पेक्षा जास्त गायकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.