बोर्लीपंचतन स्थानकावर दिव्यांगांचे हाल; व्हिलचेअर, रॅम्प नसल्याने ज्येष्ठांचीही गैरसाेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:29 AM2021-01-29T01:29:46+5:302021-01-29T01:30:48+5:30

सुविधा देण्याची प्रवाशांची मागणी 

The condition of the disabled at Borlipanchatan station; Lack of wheelchairs and ramps is also a problem for seniors | बोर्लीपंचतन स्थानकावर दिव्यांगांचे हाल; व्हिलचेअर, रॅम्प नसल्याने ज्येष्ठांचीही गैरसाेय

बोर्लीपंचतन स्थानकावर दिव्यांगांचे हाल; व्हिलचेअर, रॅम्प नसल्याने ज्येष्ठांचीही गैरसाेय

googlenewsNext

गणेश प्रभाळे

दिघी : एसटी बसस्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर आणि रॅम्प उपलब्ध करून देण्याची घोषणा एसटी महामंडळाकडून करण्यात आली हाेती. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बसस्थानकात अद्याप व्हिलचेअर आणि रॅम्पची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग प्रवाशांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी - जंजिरा अशी पर्यटनस्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या - जाणाऱ्या ६४ गाड्यांची नोंद होत असून, मुंबई, पुणे शहरांसह गाव खेड्यातील  नागरिक प्रवास करत आहेत. अशा वर्दळीच्या बसस्थानकातून अपंग व वयोवृद्धांना व्हिलचेअर नसल्याने एसटीचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.

तालुक्यामध्ये अपंगांची ११०० संख्या असून, यातील जवळपास ७०० नागरिक एसटी प्रवास करतात. याहून जास्त ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. शिवाय येथील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रातील बसस्थानक असल्याने प्रवाशांना एसटीची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही, अशांची व्हिलचेअर अभावी फारच गैरसोय होते. दिव्यांगांना समान संधी व हक्काच्या संरक्षणासाठी अशा सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने ही पावले उचलली आहेत. मात्र, ग्रामीण भागातून उलट चित्र पाहायला मिळत आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढण्यासाठी वाहक मदत करेल, असे ‘एसटी’च्या दर्शनी भागावर लिहून असले तरी, ही मानवता अपवादानेच दाखविली जाते. शिवाय बसस्टॉपवरून बसपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्यांगांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. परंतु प्रवाशांच्या गर्दीमध्ये मिळणारा हा मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो, असे अपंग प्रवाशांकडून सांगण्यात येते.

बोर्लीपंचतन बसस्थानकामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता व्हीलचेअर असावी तसेच एसटीमध्ये रिझर्व्ह असलेले दिव्यांगांचे आसन हे रिझर्व्हच ठेवले जावे. त्याठिकाणी अन्य प्रवाशांना बसू देऊ नये.
-नीलेश नाक्ती, दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष

बोर्लीपंचतन एसटी स्थानक हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. अनेकवेळा येथे दिव्यांग प्रवासी येतात मात्र शेडखाली बसायला रॅम्प नसल्याने जाता येत नाही. त्यामुळे तसा रॅम्प हा बोर्लीपंचतन बस स्टँडला बांधला गेल्यास दिव्यांगांसाठी सोयीचे ठरेल. एसटी प्रशासनाने याचा विचार करावा.  -दिव्यांग प्रवासी

बसस्थानकात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअरसह रॅम्पची सुविधा करणे गरजेचे आहे. तसा नियम आहे; मात्र त्याकडे साेयीस्करपणे डाेळेझाक केली जाते. व्हिलचेअर आणि रॅम्प नसल्याने प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागताे. 
-ज्येष्ठ नागरिक

श्रीवर्धन आगार व्यवस्थापनाकडून या समस्येचे निवारण करण्यात येईल. लवकरच रॅम्प बांधून व्हिलचेअरची सुविधा दिली जाईल. त्यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना हाेणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका हाेईल. -तेजस गायकवाड, आगार व्यवस्थापक, श्रीवर्धन

Web Title: The condition of the disabled at Borlipanchatan station; Lack of wheelchairs and ramps is also a problem for seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.