अलिबाग : रविवारी व सोमवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, मुरुड व श्रीवर्धन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सागरी किनारी एकूण २१ लोखंडी पिंप बेवारस अवस्थेत सापडले. यापैकी मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशिद समुद्र किनारी एक,श्रीवर्धन समुद्र किनारी शेखाडी बंदर येथे एक आणि रेवदंडा समुद्र किनारी १९ अशी एकूण २१ लोखंडी सिलबंद पिंपे आहेत. प्रत्येक पिंपात २०० लिटर यामध्ये काळे तेल असल्याचे स्थानिक पोलिसांना प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या आठवड्यात अलिबाग समुद्र किनारी आलेले काळे तेल व काळ््या तेलाचे गोळे यांच्याशी या पिंपाचा काही संबंध आहे का, याची तपासणी होत आहे.काशिदच्या समुद्रात पाण्यात तरंगणारी ही बेवारस लोखंडी पिंपे सर्वप्रथम शनिवारी भारतीय तटरक्षक दलाच्या गस्तीवरील हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांना दिसून आली. त्यांनी याबाबत रायगड जिल्हा पोलिसांना माहिती दिल्यावर स्थानिक पोलिसांनी त्या पिंपाचा मागोवा घेतला. रेवदंडा येथे सापडलेल्या या १९ लोखंडी पिंपांपैकी एका सिलबंद पिंपाच्या झाकणावर ‘शेल केमिकल ’असे लिहिलेले आहे. या अनुषंगाने शेल केमिकल कंपनीच्या मुंबई येथील अधिकऱ्यांशी पोलिसांनी संपर्क केला आहे. अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यातच एक बोट अरबी समुद्रात बुडाल्याचे वृत्त आहे. त्यातील ही पिंपे आहेत का, याबाबतही तपास करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
काळ्या तेलाचे २१ पिंप जप्त
By admin | Updated: August 4, 2015 03:10 IST