माकपाच्या सरकारविरोधी रास्ता रोकोला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: September 3, 2015 02:47 IST2015-09-03T02:47:23+5:302015-09-03T02:47:23+5:30

भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार,

Composite response to CPI (M) government's Rok Rokola Palghar district | माकपाच्या सरकारविरोधी रास्ता रोकोला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

माकपाच्या सरकारविरोधी रास्ता रोकोला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

जव्हार : भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार, विक्रमगड, वाडा, डहाणू येथील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी बुधवारी रास्ता रोको करण्यात आले. त्याला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला असला तरी जव्हारमध्ये त्याचा परीणाम दिसून आला.
या वेळी तलावली-वेहेलपाडा येथे यशवंत गरेल, सरपंच, बाबुलाल फडवळे यांच्या नेतृत्वाखाली १०० ते १२५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला, तर तलवाडा येथे तालुका कमिटी सदस्य संजय काकड, अमृत भावर, चंदू भावर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. कासा येथे चंद्रकांत वरठा, विभागीय सचिव चिंतामण लाबड आणि कॉ. एडवर्ड वरठा यांच्या नेतृत्वाखाली ४०० ते ५०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. विक्रमगड नाका, घोलवड, सावटा, उपराळे, डहाणू, वाणगाव, तलासरी येथेही मोठ्या संख्येने मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.
या रास्ता रोकोमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लांबून येणारे प्रवासी रास्ता रोकोमध्ये अडकल्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. (वार्ताहर)

सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे पुकारलेल्या देशव्यापी बंदला तलासरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तलासरीत बाजारपेठ पूर्णत: बंद होती, तर तालुक्यातील चार ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रास्ता रोको करण्यात आल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली. या बंदचा फटका नागरिकांबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही बसला.
बंदच्या पार्श्वभूमीवर तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ग्रामसेवक संघटनाही बंदमध्ये उतरल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्याही संपात उतरल्या. वाहतूक बंद पडल्याने विद्यार्थ्यांना ६ ते ७ कि.मी. पायी चालत शाळेत यावे लागले.
तलासरी-उधवा रोडवर मोडगावफाटा, तलासरी-उंबरगाव रोडवर वडवली नाका, करजगाव ते उंबरगाव रोडवर वसा-डोंगरीपाडा, आमगाव-संजान रोडवर आमगाव-मांगातपाडा येथील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. या भागातील कारखाने, कॉलेजही बंद ठेवण्यात आली होती. तसेच भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने कामगार कायद्यात व भूसंपादन कायद्यात भयानक बदल केल्याने लाल बावटा जिल्हा कामगार युनियन यांच्या वतीने तलासरीत रॅलीचेही आयोजन करण्यात आले.

Web Title: Composite response to CPI (M) government's Rok Rokola Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.