Collector's instructions: Avoid installing public Ganapati | जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे

रायगड : गणेशोत्सवाचा सण साजरा करण्याची सर्वांनाच घाई झाली असेल, परंतु सण साजरा करण्याआधी जरा थांबा. कारण सरकार आणि प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करताना काही नियम आणि अटी आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी या वर्षी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे. सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करायचीच असेल, तर संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडून आवश्यक ती पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी २९ जुलै रोजी जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने यंदा गणेशोत्सव कसा साजरा करावा? गणेशमूर्तीची उंची किती असावी? विसर्जन कधी करावे? हे मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश, तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे.
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादित राहील, याची दक्षता घ्यावी. या वर्षी शक्यतो गणेशोत्सव कमीतकमी दिवस साजरा करावा, तसेच पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास, या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षांच्या विसर्जनावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळणे शक्य होणार आहे.
उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई असेल. या वर्षी गणपती उत्सवासाठी पर राज्यातून, पर जिल्ह्यातून येणाºया भविकांनी रायगड जिल्ह्यात ७ आॅगस्टपूर्वी दाखल होण्याचे आहे व तद्नंतर १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’ राहण्याचे आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात स्थापित कोरोना प्रतिबंधक ग्राम समिती व मुख्यत्वे करून संबंधित ग्रामपंचायत सरपंच यांची राहील, तसेच शहरी भागात संबंधित मुख्याधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत यांची राहील.

धार्मिक कार्यक्रमांना कमाल १० व्यक्तिंना परवानगी
१आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भातील नियमांचे, तरतुदीचे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन अथवा अन्य धार्मिक कार्यक्रमांना कमाल
१० व्यक्तिंना परवानगी असेल.

२गणेशोत्सवादरम्यान घरगुती गणपतींच्या दर्शनासाठी गृहभेटी देणे टाळावे, तीर्थप्रसादासाठी, महाप्रसादासाठी उपस्थिती टाळावी. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी.

३ जणेकरून गर्दी कमी होईल. या कालावधीत गणपती मंडळाला भेटी दिलेल्या ठिकाण, कार्यालय, व्यक्ती यांची नोंद करण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी, जेणेकरून कदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे ठरेल.

दिवसातून ३ वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे
गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची, तसेच सॅनिटायजिंग, थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाºया भाविकांसाठी शारीरिक अंतराचे, तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायजर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, तसेच दिवसातून ३ वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. सार्वजनिक स्थळी विसर्जन करण्यासाठी गर्दी करू नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये. विसर्जनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक न जाता, कॉलनी, आळीतले गणपती हातगाडी, ट्रक, टेम्पो आदीमध्ये ठेवून सर्व गणपतींचे फक्त २ ते ३ व्यक्तिंद्वारे विसर्जन करावे.

Web Title: Collector's instructions: Avoid installing public Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.