बिरवाडीमध्ये गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिक संतप्त
By Admin | Updated: May 6, 2017 06:08 IST2017-05-06T06:08:22+5:302017-05-06T06:08:22+5:30
महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या

बिरवाडीमध्ये गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने बिरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ऐन लग्नसराईमध्ये ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा माती मिश्रित असल्याने नागरिकांना बिसलेरी, किंवा बॅरेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सात हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येला काळनदीवरील जॅकवेलद्वारे व एमआयडीसीकडून पाणी घेऊन नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. गेले दोन दिवस बिरवाडीमध्ये नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्यासाठी बिसलेरी बाटल्या, किंवा बॅरेलमधील पाणी वापरावे लागत आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्य सेवकांनी या पाण्याचे नमुने तपासणीकरिता ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
याबाबत बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी. एस. म्हामुणकर यांच्याशी संपर्क साधला असता, बिरवाडी काळनदीवरील जॅकवेलमधील गाळ काढण्याचे काम सुरू असून, पाण्यामध्ये टीसीएल पावडर व तुरटी फिरविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे काम सुरू आहे. बिरवाडीमधील नागरिकांकरिता ‘राष्ट्रीय पेय जल’ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करून त्यांची पाण्याची समस्या मार्गी लावण्याकरिता सरकारने पाच कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. मात्र, त्या योजनेचे काम अजून परिपूर्ण झाले नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पी.एस. म्हामुणकर यांनी दिली आहे.