उरणमधील ३३ बेकायदेशीर टपऱ्यांवर सिडकोची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 22:00 IST2022-12-23T22:00:38+5:302022-12-23T22:00:48+5:30
उरण तालुक्यातील सिडकोच्या बहुतेक मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत.

उरणमधील ३३ बेकायदेशीर टपऱ्यांवर सिडकोची कारवाई
- मधुकर ठाकूर
उरण: जेएनपीटी टाऊनशिप समोरच सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर टपऱ्यांवर शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली.या कारवाईत सुमारे ३३ बेकायदेशीर टपऱ्या जमिनदोस्त केल्या आहेत.
उरण तालुक्यातील सिडकोच्या बहुतेक मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवणे सिडकोला मोठी डोकेदुखी झाली आहे.सिडकोच्या जागांवर अतिक्रमणं करून टपऱ्या उभ्या करायच्या व त्या परप्रांतियांना भाड्याने देवून हजारो रुपये कमविण्याचा मोठा गोरखधंदा काही स्थानिक पुढाऱ्यांनी सुरू केला आहे.अशा टपऱ्या जेएनपीटी टाऊनशिप समोर मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या होत्या.
सदर बाबतच्या तक्रारी सिडकोच्या अतिक्रमण विभागाला प्राप्त होताच सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांनी शुक्रवारी मोठा फौजफाटा घेऊन पोलिस बंदोबस्तात त्या टपऱ्यांवर धडक कारवाई करून त्या जमिनदोस्त केल्याआहेत.काही स्थानिकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांचा विरोध कुचकामी ठरला.मात्र हटवलेल्या टपऱ्या पुन्हा उभ्या राहणार नाहीत याची काळजी सिडको घेईल का असा सवाल उपस्थित होत आहे.