कर्जतमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक होणार चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:35 AM2019-09-04T00:35:31+5:302019-09-04T00:35:47+5:30

राजकीय हालचालींना वेग : सुरेश लाड यांना हॅट्ट्रिक साधण्यास करावे लागणार परिश्रम

Churshi will hold this year's assembly elections in Karjat | कर्जतमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक होणार चुरशीची

कर्जतमध्ये यंदाची विधानसभा निवडणूक होणार चुरशीची

Next

विजय मांडे 

कर्जत : हल्लीचा कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि पूर्वीच्या खालापूर मतदारसंघामध्ये जितक्या निवडणुका झाल्या, त्या १९८० पासून चुरशीच्या झाल्या, त्यापैकी काही निवडणुकांमध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी झाली. परिणामी, पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराने या मतदारसंघात साडेअठराशे मतांची आघाडी घेतल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड आमदार होऊन आपली हॅट्ट्रिक साधतील, असे वाटत असतानाच २५ वर्षांच्या कर्जत नगरपरिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागला. विशेष म्हणजे, लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली, तसेच कर्जत तालुक्यातही त्याचे पडसाद उमटल्याने या वेळी काय होईल? ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

१९९५ साली शिवसेनेने देवेंद्र साटम यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेस पक्षाने उल्हास देशमुख यांना उमेदवारी दिली, त्या वेळीही रांगेत असलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा डावलले. याचा निषेध म्हणून रामदास शेंडे यांनी बंडखोरी केली तर शेतकरी कामगार पक्षाने विलास थोरवे या तरुण कार्यकर्त्याला निवडणूक रिंगणात उतरविले. या वेळी साटम पुन्हा निवडून आले. मात्र, बंडखोर रामदास शेंडे यांनी अपक्ष म्हणून १८ हजार मते मिळवून निवडणुकीत रंगत आणली होती. उमेदवारी देण्यात काँग्रेसची भूमिका नेहमीच चुकत आली, याला अपवाद केवळ १९८० च्या तुकाराम सुर्वे यांच्या उमेदवारीचा आहे. निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देणे ही काँग्रेसची परंपरा वेळोवेळी मतांवर परिणाम करणारी ठरली. याबद्दल तालुक्यातील कार्यकर्ते नेहमीच बॅ. अंतुलेंना दोष देत होते हे कितपत सत्य ते अंतुलेच जाणोत.
१९९९ साली काँग्रेस पक्षात दुफळी झाली, राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला. कर्जतमधील सुरुवातीला तानाजी चव्हाण, एकनाथ धुळे, वसंत नाईक व आदल्याच दिवशी अंतुलेंवर छत्री धरणारे अशोक भोपतराव राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यानंतर पुंडलिक पाटील व अगदी शेवटच्या क्षणी सुरेश लाड उमेदवारी घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. याचे सारे श्रेय लाड यांचे परममित्र सुनील तटकरेंना जाते. दोन वेळा निवडून आलेल्या साटम यांचा पराभव लाड यांनी केला, त्या वेळी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती आणि विशेष म्हणजे, लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकाच वेळी झाली होती. तर काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला अपशकून करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविताना नुकतेच नगराध्यक्ष झालेल्या नवख्या वसंत भोईर यांना उमेदवारी देऊ केली; परंतु उपयोग झाला नाही. मात्र, विद्यमान आमदार साटम तिसºया क्रमांकावर गेले व जेमतेम चार हजार मतांनी लाड यांनी भोईर यांचा पराभव केला. त्या वेळी सासरे-जावई ही लढत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता.

२००४ साली पुन्हा साटम व लाड यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिली, या वेळी वसंत भोईर यांचे कनिष्ठ बंधू संतोष भोईर यांना शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी देऊन लाड यांना अपशकून करण्याचा प्रयत्न केला तो १०० टक्के यशस्वी झाला. देवेंद्र साटम पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाले. मात्र, अनपेक्षित पराभव पचवून सुरेश लाड पुन्हा कामाला लागले.

२००९ च्या विधानसभेची उमेदवारी सुरेश लाड यांना पुन्हा देण्यात आली. तेव्हा मात्र त्यांना अपशकून करण्यासाठी भोईर नव्हते, भोईर बंधू राष्ट्रवादीत आल्याने लाड यांना निवडणूक सोपी झाली. त्यातच शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली. आमदार साटम यांच्या विरोधात हनुमान पिंगळे यांनी दंड थोपटले, त्यांना बहुसंख्य नाराज शिवसैनिकांनी उचलून धरले काही काँग्रेसजनांनीही त्यांना ‘हातभार’ लावला. पिंगळे यांना तब्बल २५ हजार मते मिळाली त्यामुळे लाड यांना आपल्या पराभवाचा वचपा काढता आला. लाड पुन्हा विधानसभेत गेले. त्यांनी विकासकामांना प्राधान्य दिले.

पक्षांतरामुळे वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी असेल, कारण शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली आहे. मात्र, कर्जत नगरपरिषदेमध्ये शेकापक्षाला योग्य वागणूक न दिल्याने व उमेदवारीमध्ये लाडांचे ‘लाड’ केल्याने २५ वर्षांची सत्ता हातची गेली आहे. विशेष म्हणजे, खुद्द आमदार लाड यांना आपल्या कन्येचा पराभव पचवावा लागला. याचे श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जाते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीबरोबर राहून रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरेंना खासदार केले आहे, तर मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला तीन क्रमांकावरून दुसºया क्रमांकावर आणले आहे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना साडेअठराशे मतांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार व नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावल्याने त्याचा परिणाम कर्जत विधासनसभा मतदारसंघातही सुरू आहे. सुरेश लाडसुद्धा भाजपात जाणार या चर्चेला खूपच उधाण आले होते; परंतु लाड यांनी ‘मी मुळीच भाजपमध्ये जाणार नाही’, असे जाहीर केल्याने त्यावर सध्यातरी पडदा पडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेले महेंद्र थोरवे शिवसेनेची उमेदवारी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संतोष भोईर, हनुमंत पिंगळे, सुरेश टोकरेसुद्धा शिवसेनेमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. खरे तर माजी आमदार देवेंद्र साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुख्यमंत्रांनी उमेदवारीचा ‘शब्द’ दिला असल्याचे समजते. वसंत भोईरसुद्धा भाजपमधून उमेदवारी मिळविण्याच्या खटपटीत आहेत आणि नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वंचित आघाडी आणि मनसेची चाचपणी सुरू आहे. जर शिवसेना-भाजप युतीमध्ये बिघाड झाला तर या निवडणुकीत काय होईल? ते सांगता येत नाही.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीचे विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवून त्यांचे उमेदवार एकनाथ पिंगळे यांनी साडेसतरा हजार मते मिळवली होती, तर आगरी समाजाचे अपक्ष उमेदवार सावळाराम जाधव यांनी साडेबारा हजार मते मिळवली. या वेळी सुरेश लाड यांनी अनेकांच्या अनामत रकमा जप्त केल्या
होत्या.

मागील वेळी काय घडले
२०१४ ची निवडणूक मोठी चुरशीची झाली. सुरेश लाड यांनी आपले आमदारपद कसे-बसे वाचविले, त्या वेळी ऐन वेळेला शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले जिल्हा उपप्रमुख महेंद्र थोरवे यांनी शेकापक्षाची साथ घेऊन विधानसभा लढविली. त्यांच्याबरोबर बहुतांश शिवसैनिकांनी थोरवे यांची साथ दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. शिवसेनेने मागील निवडणुकीत बंडखोरी केलेल्या हनुमंत पिंगळे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली होती. त्यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, थोरवे यांनी आमदार लाड यांना चांगली लढत दिली. त्यांचा केवळ १९०० मतांनी पराभव झाला आणि लाड कसे-बसे पुन्हा विधानसभेत गेले. त्यांना विधानसभेत पाठविण्याचे श्रेय महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास थोरवे यांना जाते.

Web Title: Churshi will hold this year's assembly elections in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.