चिपळूण नागरी पतसंस्था ठरली मॉडेल संस्था
By Admin | Updated: May 21, 2015 00:07 IST2015-05-20T22:03:59+5:302015-05-21T00:07:23+5:30
सहकारातील ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त अपर आयुक्त,सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय,एस. बी. पाटील यांनी केल निवड

चिपळूण नागरी पतसंस्था ठरली मॉडेल संस्था
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मॉडेल संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारातील संस्थांचे राष्ट्रीयस्तरावर नाविन्यपूर्ण व समाजहिताच्या कामांचे मूल्यमापन करुन इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठराव्यात, अशा आदर्श संस्थांची मॉडेल संस्था म्हणून निवड करण्यात येते. सहकारातील ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई एस. बी. पाटील यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची निवड केली. संस्थेने शाखा परिसरातील गावात सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना समन्वयक नेमले आहे. त्याद्वारे आजघडीला ७५०हून अधिक कार्यकर्ते समन्वयक म्हणून काम करीत आहेत. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील जनतेला संस्थेची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी संस्थेने फिरती सेवा केंद्र ही संकल्पना राबवून जिल्ह्यात ९०हून अधिक सेवा केंद्र कार्यान्वित केली आहेत. या केंद्रांमार्फत आठवड्यातून एक दिवस संस्थेची थेट सेवा दिली जाते. त्याचबरोबर अल्प उत्पन्न गटातील जनतेला बचतीची सवय लागावी, यासाठी संस्थेने मासिक पद्धतीने ठेव संकलनाच्या १ ते १० वर्षांसाठीच्या वेगवेगळ्या मुदतीच्या ठेव योजना कार्यान्वित करुन ४५ हजारांहून अधिक कुटुंब या योजनेत समाविष्ट केली आहेत.
पतसंस्थेने मिळवलेल्या या यशाबद्दल भागधारक आणि ग्राहकांकडून पतसंस्थेचे अभिनंदन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)