चिल्हे- देवकान्हे रस्ता उखडला
By Admin | Updated: April 22, 2017 02:43 IST2017-04-22T02:43:41+5:302017-04-22T02:43:41+5:30
रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रोहे तालुक्यातील खांब-पालदाड मार्गाअंतर्गत येणाऱ्या चिल्हे ते देवकान्हे या अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून

चिल्हे- देवकान्हे रस्ता उखडला
रोहा : रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या रोहे तालुक्यातील खांब-पालदाड मार्गाअंतर्गत येणाऱ्या चिल्हे ते देवकान्हे या अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून हा रस्ता उखडला आहे. यामुळे येथील अपघाताचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
खांब-पालदाड मार्गावरून दररोज शेकडोच्या संख्येने वाहने ये-जा करीत असतात त्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी आढळून येते. मागील ८-१० वर्षांपूर्वी मार्गाचे पक्के डांबरीकरण केल्यानंतर पुढील कालावधीत या मार्गाच्या डागडुजी व दुरुस्तीकडे संबंधितांकडून वेळोवेळी लक्ष न पुरविल्याने या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडत गेली. तर गतवर्षी विधान परिषद आ.सुनील तटकरे व आ.अनिल तटकरे यांनी लक्ष पुरविल्याने खांब ते चिल्हे व या वर्षी देवकान्हे ते बाहे या टप्प्याचे पक्के डांबरीकरण व कारपेटचे काम पूर्णत्वास नेल्याने प्रवासी व रहिवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तर सद्यस्थितीत चिल्हे ते देवकान्हे व बाहे ते उडदवणे हा मार्ग प्रचंड उखडल्याने प्रवासाच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी या अंतर्गत मार्गाच्या दुरुस्तीकडे लक्ष पुरविले नाही तर प्रवास करणे फार मोठे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात कसरत करावी लागेल.
खांब ते पालदाड मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी वाहने, कंपनी कामगार, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, किरकोळ विक्रे ते, शेतकरीवर्ग ये -जा करीत असतात. परंतु मुख्य प्रवासाचा रस्ताच खड्डेमय झाल्याने साऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे निदान पावसाळ्यापूर्वी तरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन आमची जाचातून सुटका व्हावी अशाप्रकारची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)