Charlotte Lake will implement solar power projects | शार्लोट लेकवर सौरऊर्जा प्रकल्प राबवणार

शार्लोट लेकवर सौरऊर्जा प्रकल्प राबवणार

माथेरान : सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. वीज नसल्याने शार्लोट लेकवरील पम्पिंग मशिन बंद झाल्यामुळे नियमितपणे आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही, त्यामुळे पर्यटनावरही विपरित परिणाम होत आहे. परिणामी, शार्लोट लेक येथील पाणी पम्पिंग हाउस येथे सौरऊर्जेचा वापर करण्याचा विचार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता राजेंद्र हवळ यांनी सांगितले.

शार्लोट लेक येथे सौरऊर्जा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी तज्ज्ञ मंडळींना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी जागेचा सर्व्हे केला. हवळ यांनी अंबरनाथ नगरपालिकेकरिताही पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा प्रस्ताव बनवून घेतला आहे. या बैठकीला माथेरान नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत, सौरऊर्जातज्ज्ञ विश्वास हिरोळीकर, नगरपरिषद ज्येष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान आदी उपस्थित होते.

माथेरानमध्ये कुठल्याही प्रकारची विकासकामे करताना मुख्यत: वाहतुकीच्या गहन समस्येला सामोरे जावे लागते. इथे होणारा वीजपुरवठा हा खोपोली येथून नेरळ मार्गे होतो. खोपोली अथवा नेरळ येथे काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचा त्रास माथेरानकरांना आणि पर्यटकांना सोसावा लागतो. खंडित वीजेमुळे नेरळ येथील उल्हासनदीतून होणाºया पाणीउपशावरही परिणाम होतो. त्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाबाबत विचार करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प शार्लोट लेक इथे सुरू करण्यात येणार असून तत्पूर्वी याबाबत डीपीआर बनवून शासन मान्यता मिळाल्यावर शासनाकडून अनुदान अपेक्षित आहे.

शार्लोट लेक इथे वाढीव पाणीसाठाकामी दरवर्षी दक्षिणेला मातीचा बंधारा बांधण्यात येतो. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर केल्यास खर्च कमी होईल. लेकजवळ ओव्हर फ्लो लाइट बनविण्यासाठीही उपयोग केला जाऊ शकतो. पावसाळ्यात लेकमध्ये दगडमाती साठते. त्याकरिता ठोस उपाययोजना म्हणून जाळ्या बसविण्यात येतील. एकंदरच इथे सौरऊर्जेचा वापर केल्यास विजेच्या बचतीसह पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही.

शार्लोट लेकवरील सौरऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिल्यास नेरळ येथून येणाºया पाण्याच्या पम्पिंग हाउस इथेसुद्धा अशाचप्रकारे सौरऊर्जेचा वापर केला जाईल. जेणेकरून सुट्टींच्या हंगामात पाण्याची कमतरता भासणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करताना गावातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- प्रसाद सावंत, नगरपरिषद गटनेते

माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. वनराईने आच्छादित केलेल्या जागेत शार्लोट लेक आहे. पर्यटन क्षेत्रावर विसंबून असणाºया स्थानिक लोकांची आणि येणाºया पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्राथमिक टप्प्यात हा प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे. फिल्टर हाउस आणि शार्लोट लेक याच जागांवर सुरुवात करणार आहोत. लेकवर विद्युत रोषणाईही यानिमित्ताने केली जाईल.
- राजेंद्र हवळ, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माथेरान

Web Title: Charlotte Lake will implement solar power projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.