चांदोरे, नळेफोडीचा वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून दिवस-रात्र करण्यात आले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 23:59 IST2020-07-19T23:59:01+5:302020-07-19T23:59:27+5:30
फीडरवरील १० ते १५ वाडी, वस्त्याही प्रकाशमान करण्यात आले आहेत.

चांदोरे, नळेफोडीचा वीजपुरवठा सुरळीत; महावितरणकडून दिवस-रात्र करण्यात आले काम
माणगाव : अतितीव्र निसर्ग चक्रीवादळामुळे माणगाव येथील महावितरण कंपनीच्या वीज वितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. ही यंत्रणा पूर्ववत करण्याकरिता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करीत असून, २२ के.व्ही चांदोरे फीडरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. भांडुप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी चांदुरे येथे प्रत्यक्ष जाऊन कामाचा आढावा घेतला व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, तसेच ग्रामस्थांना भेट देऊन सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.
साले स्विचिंग उपकेंद्रातून निघणारी ४५ किमी चांदुरे फीडरवरील बहुतांश उच्चदाब वाहिनी; डोंगर, दरी व घाटातून जात असल्यामुळे या ठिकाणी पडलेले खांब उभे करणे फार आव्हानात्मक काम होते. या भागातील अनेक वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या, त्यांची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. चांदोरे फीडरवर ८४ उच्चदाब खांब, ५४ डीटीसी, ३२० लघुदाब खांब बाधित झाले होते.
अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या निर्देशानुसार फीडरवर तातडीने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तीन कंत्राटदार; आर.डी. मगर, आरआरबी इलेक्ट्रिकल्स यांची नियुक्ती करण्यात आली होती. कार्यकारी अभियंता, ठाणे-१ जीवन चव्हाण व कार्यकारी अभियंता, रोहा बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांनी कंत्राटदारांच्या मदतीने भर पावसात काम करून, या फीडरवरील १६ गावांपैकी नाइटने, महादपोली, पाचोळे, रिळे, काकल, ऊसर, साई, निळगुंड व वावे या गावांचा वीजपुरवठा सुरू के ला होता. रविवारी चांदुरे व नळेफोडी या गावाचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.
याशिवाय या फीडरवरील १० ते १५ वाडी, वस्त्याही प्रकाशमान करण्यात आले आहेत. यामुळे ३,५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश मिळाले आहे. उर्वरित गावांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्यासाठी काम सुरू आहे.