बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 01:41 AM2021-01-05T01:41:46+5:302021-01-05T01:42:19+5:30

स्वच्छतेमध्ये अडथळा : वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडील यंत्रणा अपुरी

The challenge of picking up unattended vehicles | बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वच्छता अभियानादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानावरही परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असून त्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने उचलण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनानेही वाहनांना नेाटीस लावणे व ती उचलून नेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बेवारस वाहनांची संख्या खूप असल्यामुळे ही वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडील जागा अपुरी पडत असून ती घेऊन जाण्यासाठीची यंत्रणाही अपुरी पडत आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये नोटीस चिकटवल्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप अनेक वाहने उचलण्यात आलेली नाहीत. एक महिन्यापूर्वी तुर्भे वाशी रोडवर कांदा मार्केटच्या जवळील पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला आग लागली होती. एक महिना झाल्यानंतरही रिक्षाचा सांगाडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. पामबीच रोडवरही बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सारसोळेजवळ एक कार आग लागून खाक झाली आहे. अनेक दिवसांपासून कारचा सांगाडा तसाच पडून आहे.


शहरातील प्रत्येक नोडमध्ये वापर होत नसलेली वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची साफसफाईही करता येत नाही. या वाहनांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता अभियानानिमित्त महानगरपालिकेने नियमित रस्ते सफाई, रोडच्या बाजूच्या संरक्षण भिंतींची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे.

ठोस यंत्रणा हवी
शहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नियमाप्रमाणे वाहनांवर नोटीय चिकटवणे, नोटीस संपल्यानंतर ती वाहने उचलून नेणे, उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ व योग्य मुदतीनंतर त्यांचा लिलाव करणे याविषयी नियमाप्रमाणे व वेेळेत कार्यवाही झाली तरच हा प्रश्न मिळणार आहे. अन्यथा रोडवरील बेवारस वाहनांचा कचरा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.

Web Title: The challenge of picking up unattended vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.