शुभेच्छा, भेटवस्तू देऊन ईद उत्साहात साजरी, अलिबाग मार्केटमधील मशिदीत केले नमाज पठण
By निखिल म्हात्रे | Updated: April 11, 2024 15:25 IST2024-04-11T15:23:47+5:302024-04-11T15:25:17+5:30
अलिबाग मार्केटमधील मशिदीत हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

शुभेच्छा, भेटवस्तू देऊन ईद उत्साहात साजरी, अलिबाग मार्केटमधील मशिदीत केले नमाज पठण
अलिबाग : ईदचा चंद्र बुधवारी रात्री दिसल्यानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता ठिकठिकाणच्या मशिदीत ईदनिमित्त खास नमाज पठण करण्यात आले. जिल्ह्यातील लाखो मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले. अलिबाग मार्केटमधील मशिदीत हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.
मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा करण्यात येणारा सण अशी त्याची ओळख आहे.
ईदनिमित्त राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम राहावी, अशी प्रार्थना मुस्लिमांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. ‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्हाभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. नमाज पठणानंतर शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करताना मुस्लिम बंधू- भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.