केबल चालकांवर आसूड
By Admin | Updated: September 29, 2015 01:25 IST2015-09-29T01:25:43+5:302015-09-29T01:25:43+5:30
डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे

केबल चालकांवर आसूड
आविष्कार देसाई , अलिबाग
डिजिटलायझेशन अनिवार्य करण्यासाठी जिल्ह्यातील २१ बहुविध यंत्रणा परिचालकांवर (मल्टी सिस्टीम आॅपरेटर) सरकारने वेळेच्या बंधनाचा चाबूक उगारला आहे. वेळेत काम पूर्ण केले नाही तर त्यांना प्रक्षेपणाचा मिळणारा सिग्नल बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आवडीच्या कार्यक्रमावर पाणी सोडावे लागू शकते. सेटटॉप बॉक्स उपलब्ध होत नसल्याचे कारण बहुविध यंत्रणा परिचालकांनी जिल्हा प्रशासनापुढे केले आहे.
रायगड जिल्ह्यात २१ मल्टी सिस्टीम आॅपरेटर असून त्यांच्या खाली ५८९ केबल आयोजक आहेत. त्यांच्यामार्फत एकूण एक लाख २ हजार ९७८ केबल जोडण्या आहेत. पैकी ग्रामीण भागात ८७ हजार ११४ आणि शहरी भागात १५ हजार ८६४ केबल जोडण्या आले आहेत. ग्रामीण भागात ८३ हजार ७६४ तर शहरामध्ये ८७६ अशा एकूण ८४ हजार ६४० केबल जोडण्यांमध्ये सेटटॉप बॉक्स लागलेले नाही.नगर पालिकाक्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागामध्ये ही मुदत ३१ डिसेंबर २०१६ अशी आहे. जिल्ह्यात एक लाख ८९ हजार ७१५ डीटीएच ग्राहक आहेत.
पूर्वी करमणुकीची फारच कमी साधने अस्तित्वात होती. त्यामध्ये प्रामुख्याने गावच्या जत्रा आणि जत्रेमध्ये असणारे विविध खेळ, तमाशा, टुरिंग टॉकीजमधील सिनेमा यांचा त्यामध्ये समावेश होता. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घरबसल्या मनोरंजनाचे साधन उपलब्ध करून दिले. त्यामध्येही सुरुवातीला एकच वाहिनी (चॅनल) दिसत होते. त्यानंतर डीडी मेट्रो हे चॅनल सुरू झाले.
प्रेक्षकांना मनासारखे चॅनल पाहता येत नव्हते आणि न बघणाऱ्या चॅनलचा भुर्दंडही त्यांच्यावर पडत होता. त्यामुळे केंद्र सरकारने द केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट१९९५ हा कायदा आणला. या कायद्याच्या कलम ४ अन्वये दूरचित्रवाणीचे कार्यक्रम डिजिटल अॅड्रेसेबल सिस्टीमद्वारे प्रक्षेपित करावे लागणार आहेत. त्यासाठी सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे.