मुरुडमध्ये बोटधारकांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:33 IST2021-01-03T23:33:05+5:302021-01-03T23:33:15+5:30
४०० लोकांची मर्यादा ठेवल्याने संताप; जंजिरा किल्ला बंदच राहिल्याने हजारो पर्यटकांची निराशा

मुरुडमध्ये बोटधारकांचे कामबंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड : रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वेय ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा २५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. ३ जानेवारीपासून सर्व जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, पुरातत्त्व खात्याकडून दिवसाला ४०० पर्यटकच किल्ल्यात नेले जातील, असा नियम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जलवाहतूक करणाऱ्या सर्व सहकारी सोसायट्यांची नाराजी व्यक्त केली आहे, तर बोटधारकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्यासाठी पाच सहकारी सोसायट्या असून, प्रत्येक सोसायटीला फक्त ८० पर्यटक नेता येणार असल्याने सर्व बोट मालक व चालकांनी एकत्र येत, जल वाहतूक बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध केला आहे. किल्ल्यावरील जल वाहतूक बंद ठेवल्याने हजारो पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागले आहे. रविवारची सुट्टी साधून कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, बोरीवली, भिवंडी आदी भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी आले होते, परंतु जल वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना हा किल्ला पाहाता आला नाही. यावेळी जल वाहतूक करणाऱ्या सर्व सोसायट्यांमधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४०० संख्येचा निर्बंध रद्द करा, अशी घोषणा करीत, आंदोलनाचा झेंडा फडकवला आहे. बोट मालकांनी आंदोलन पुकारल्याने जंजिरा किल्ला आता किती दिवस बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोजगाराचा प्रश्न बनला गंभीर
महालक्ष्मी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गीदी यांनी संचारबंदीच्या काळात लोक घरात बसून राहिल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध आल्याने आमचे लोक बेकारीचे जीवन जगणार आहेत, असे सांगितले. जंजिरा किल्ल्याचे संरक्षक गोगरे यांनी जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या जल वाहतूक सोसायट्यांचे ४०० पर्यटक संख्येवर आक्षेप असल्याने, किल्ला बंद ठेवण्यात आला असल्याचे सांगितले.
किल्ला पाहाण्यासाठी महाराष्ट्रातून खूप दूरवरून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रोज नवीन नियम लादल्यामुळे पर्यटकांना किल्ला न पाहता परतावे लागल्याने पर्यटकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काशीद समुद्र किनारी व अन्य समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, परंतु तिथे निर्बंध नाहीत, मग जंजिरा किल्ल्यावर निर्बंध का?
-हिरकणी गीदी, सरपंच,
राजपुरी ग्रामपंचायत
जल वाहतुकीद्वारे सेवा देताना आमचे ११० कर्मचारी इमाने इतबारे सेवा बजावत असतात. संख्येवर निर्बंध ठेवल्याने आमच्या रोजी रोटीचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी रायगड यांचा आदेश २ जानेवारीपर्यंत असताना, ४०० लोकांची मर्यादा पुढे सुरू ठेवणे हे योग्य नाही.
-इस्माईल आदमने, चेअरमन,
जंजिरा पर्यटक सहकारी सोसायटी