भाजपाबरोबर युतीचा प्रयत्न केला होता
By Admin | Updated: November 9, 2016 03:54 IST2016-11-09T03:54:17+5:302016-11-09T03:54:17+5:30
मुरु ड नगरपरिषद निवडणुकीत १५ नगरसेवक व १ नगराध्यक्षा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. राज्यात, केंद्रात शिवसेना व भाजपाचे सरकार आहे.

भाजपाबरोबर युतीचा प्रयत्न केला होता
नांदगाव/मुरुड/ आगरदांडा : मुरु ड नगरपरिषद निवडणुकीत १५ नगरसेवक व १ नगराध्यक्षा निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले आहेत. राज्यात, केंद्रात शिवसेना व भाजपाचे सरकार आहे. शिवसेना हा जातीयवादी पक्ष नसून मुस्लीम समाज सुद्धा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी पक्षाची युती ही एकमेकांचे झालेले भ्रष्टाचार लपवण्यासाठी झालेली आहे. जे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना ही युती अजिबात पटलेली नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीचे ८० टक्के कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करते झालेले असून सध्या इनकमिंग सुरू आहे. भारतीय जनता पक्षासोबत आम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही युती होऊ शकली नाही, असे रायगड जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख प्रकाश देसाई म्हणाले. मुरुड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश देसाई म्हणाले की, नगराध्यक्षा स्नेहा पाटील तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप पाटील, अशोक धुमाळ, उदय भाटकर, मेघाली पाटील, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील,महेश भगत आदींसह सर्वांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. सुनील तटकरे यांनी घराण्याचे राजकारण केले आहे. त्यांनी फक्त आपले कुटुंबच जपले. त्यामुळेच आज संदीप तटकरे व त्यांचे कुटुंब शिवसेनेत आले आहेत. हा त्यांना मोठा धक्का असून शिवसेनेचा विजय आहे. समीर शेडगे यांना शिवसेनेकडून कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते त्यामुळे त्यांना तिकीट न दिले असे काही निष्पन्न होत नाही. अपक्ष उमेदवार यांच्यासोबत चर्चा सुरू असून खरी परिस्थिती ११ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
मुरुड नगरपरिषदेत सहा नगरसेवक यांची अपात्रतेची केस रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू आहे. याबाबत प्रश्न विचारला असता देसाई म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला आम्ही घाबरत नाही. निर्णय काही येवो आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू त्यामुळे याचा बाऊ कोणी करू नये, आमचे काम आम्ही बरोबर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. नगरसेवकांचे अपात्रता ठरवण्याअगोदरच सुनील तटकरेच अपात्र ठरले आहेत. त्यांचाच मतदारसंघातील लोक शिवसेनेत प्रवेश करते होतात मग काय राहिला आहे त्यांचा करिष्मा हे स्पष्ट होत आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी संदीप पाटील, तालुका प्रमुख नीलेश घाटवल, चंद्रकांत आपराध, सुरेश पाटील, स्नेहा पाटील, कुणाल सतविडकर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)