मत्स्य तलावांना निसर्गचा बसला कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 02:13 AM2020-08-02T02:13:08+5:302020-08-02T02:13:35+5:30

सरकार दप्तरी नोंद नसल्याने मदतीस अडचण । श्रमिक मुक्ती दल शेतकऱ्यांच्या मदतीला

Billions of rupees hit nature fish ponds | मत्स्य तलावांना निसर्गचा बसला कोट्यवधींचा फटका

मत्स्य तलावांना निसर्गचा बसला कोट्यवधींचा फटका

Next

आविष्कार देसाई

रायगड : निसर्ग चक्रीवादळामध्ये मत्स्य तलावांचेही कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित तलावांची सरकार दप्तरी नोंद नसल्याने नुकसान भरपाई मिळणार नाही, असा समज अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील शेतकऱ्यांचा झाला होता. नुकसान भरपाई मिळावी, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिले.
३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिला होता. त्यामध्ये नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम यांच्यासह घर, गोठे, विजेचे खांब, विजेच्या तारा यांचे आतोनात नुकसान झाले होते. अनेक कुटुंबांचा संसार उघड्यावर आला होता. सरकारने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे, तर अद्यापही ती काही ठिकाणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात अशा प्रकारे झालेल्या नुकासानीबरोबरच शेत तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड येथील ३०० तलाव जमीनदोस्त झाले आहेत. येथील शेतकरी आपापल्या घराच्या परिसरामध्ये किमान एक तरी शेततळे उभारत आला आहे. ही परंपरा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. शेतकºयांचा उदरनिर्वाह तलावातील मासे आणि शेतात पिकवलेल्या भातावर आहे. आता काही शेतकºयांनी व्यावसायिक कारणांनी तलावांची निर्मिती केली आहे. वादळात प्रचंड नुकसान झाले आहे, असे येथील शेतकरी सुधीर पाटील यांनी सांगितले.
आमच्या शेतातील तलावांच्या नोंदी सातबारावर घेण्यासाठी सातत्याने प्रशासनाला विनंती केली आहे. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. वेळीच प्रशासनाने नोंदी केल्या असत्या, तर नुकसान भरपाई मिळण्यात कोणतीच अडचण आली नसती, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
शहापूर-धेरंडमध्ये ३००पेक्षा अधिक शेत तलाव आहेत. एका शेत तलावाच्या माध्यमातून वर्षाला किमान तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यानुसार, ३०० तलावांचे सुमारे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ढोबळ अंदाज आहे, असे श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्ह्याचे प्रमुख राजन भगत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, ५० शेतघरांचे सुमारे २५ लाख आणि मत्स्य खाद्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सरकार दप्तरी नोंद व्हावी
1शेतकºयांच्या शेतामध्ये असणारे शेत तळे हे सरकारच्या दप्तरी नोंदवले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. जानेवारी, २०२०मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेतली होती. अलिबागच्या तहसीलदारांनी या प्रकरणी कार्यवाही करावी, असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले होते. सूर्यवंशी यांनी गावात येऊन पाहणी केली होती, असेही भगत यांनी स्पष्ट केले.
2वादळात नुकसान झाल्याने पुन्हा नव्याने तळे उभारणे आर्थिक मदतीशिवाय शक्य होणार नाही. यासाठी सरकारने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. शेत तळे गावात होती किंवा नाही, हे पाहण्यासाठी चिखलामुळे तेथे पोहोचणे प्रशासनाला शक्य नसेल, तर त्यांनी ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण करावे, अशी मागणीही भगत यांनी केली आहे.
3निसर्ग चक्रीवादळाने मत्स्य खाद्य ठेवलेले शेतघर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यातील माझे स्वत:चे ८० पोती खाद्य मला फेकावे लागले आहे, असे पूनम भोईर यांनी सांगितले.
4ग्रामसेवक, महसूल, कृषी आणि मत्स्य विभाग यांनी एकत्रितपणे तलावनिहाय सर्वेक्षण, पंचनामे केल्यास नुकसानीची गंभीरता समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फक्त अलिबाग आणि पेण तालुक्यातील नुकसान काही कोटी रुपयांच्या घरात असेल. नारळ-सुपारी, फळबागायतदारांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, परंतु त्याचबरोबर आम्हाला दुर्लक्षून चालणार नाही. लॉकडाऊन काळात अन्य मासेमारी बंद होती. तेव्हा खवय्यांची गरज तलावातील माशांवरच भागवली होती, हे सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे.
- अरुण पाटील, शेतकरी

संबंधित शेतकºयांनी शेत तलावाबाबत अ‍ॅफिडेव्हिट सादर करावे. त्याच्या आधारावर सरकार दप्तरी नोंदी करून घेण्यात कोणतीच अडचण येणार नाही.
- सचिन शेजाळ, तहसीलदार, अलिबाग

Web Title: Billions of rupees hit nature fish ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.