भावे उपकेंद्र नादुरुस्त
By Admin | Updated: April 25, 2017 01:20 IST2017-04-25T01:20:43+5:302017-04-25T01:20:43+5:30
महाड तालुक्यातील वरंध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भावे आरोग्य उपकेंद्राची इमारत नादुरुस्त असल्याने या ठिकाणी

भावे उपकेंद्र नादुरुस्त
बिरवाडी : महाड तालुक्यातील वरंध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या भावे आरोग्य उपकेंद्राची इमारत नादुरुस्त असल्याने या ठिकाणी प्रसूती केली जात नसल्याने या गावातील नागरिकांना आठ किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरंध प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भावे आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करून भावे, भावेपठार, पिपळदरी, मोरानडेवाडी वाडी या गावांसह अतिदुर्गम गावातील नागरिकांना प्राथमिक स्वरूपातील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र या आरोग्य उपकेंद्रात नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत नसल्याची माहिती भावे गावातील नागरिकांनी दिली आहे.
या आरोग्य उपकेंद्रात नेमणूक केलेले आरोग्य सेवक, परिचारिका, एन.एम. मदतनीस या आरोग्य उपकेंद्रात राहात नसून एका आठवड्यातून दोन वेळा आरोग्यसेवक नीलेश मोरे, परिचारिका एम.एस .कांबळे या आरोग्य केंद्रात उपलब्ध असतात. शासनाचा नियम फक्त कागदावरच असल्याचे भावे आरोग्य उपकेंद्राच्या कारभारावरून दिसून येत आहे. गेली पाच वर्षे आरोग्य सेवक मोरे, परिचारिका कांबळे हे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र भावे आरोग्य उपकेंद्रात हे कर्मचारी राहात नाहीत. या इमारतीची अवस्था बकाल झाली असून इमारत परिसरात झाडे लावण्यासाठी खड्डे खणून ठेवले आहेत, तर काही झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. इमारतीमधील पाणी टाकीच्या शेडवरील पत्रे उडून गेले आहेत. (वार्ताहर)