जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे
By Admin | Updated: May 9, 2017 01:28 IST2017-05-09T01:28:09+5:302017-05-09T01:28:09+5:30
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दक्ष राहावे, द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित राहावेत.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दक्ष राहावे, द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग सुरक्षित राहावेत. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गावर असणारे दुभाजक सुस्थितीत करून तेथे होणारे अपघात रोखावेत, वाहतूककोंडी होऊ नये याकडे गंभीरपणे लक्ष द्यावेत, तसेच पावसाळ्यात दरड कोसळणे, झाड पडणे अशा ठिकाणी जेसीबी, पोकलेन उपलब्ध करून वाहतूक सुरळीत करावी, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिले.
मान्सूनपूर्व तयारी, तसेच आपत्तीच्या घटनेस तत्काळ प्रतिसाद देण्याबाबत आपत्तीपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोमवारी पार पडली.
गतवर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक आहे. यंदा मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करून त्याची एक सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी आणि ई-मेलद्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास १५ पर्यंत सादर करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी जिल्हास्तरीय नोडल आॅफिसर म्हणून नेमणूक करावी. नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्याचे फोन नंबर, मोबाइल नंबर, कार्यालय आणि निवासाचा पत्ता, ई-मेल आयडी याची माहिती द्यावी. जिल्हा नियंत्रण कक्ष १५ मेपासून ३० आॅक्टोबर २०१७ पर्यंत कार्यान्वित करावा, नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहील याची दक्षता घ्यावी, नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. विभागनिहाय, क्षेत्रनिहाय बैठका घेणे, प्रशिक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी यांना पाठविणे, जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.