माथेरानमध्ये बॅटरी रिक्षा सुरू कराव्यात
By Admin | Updated: August 12, 2015 23:37 IST2015-08-12T23:37:13+5:302015-08-12T23:37:13+5:30
येथील हातरिक्षाचालक आजही ब्रिटिशकालीन हातरिक्षा ओढत आहेत. देशाने तंत्रज्ञानात विकास केलेला असूनही आजही माणसाने माणसाला ओढून न्यायच्या हातरिक्षा माथेरानमध्ये आहेत.

माथेरानमध्ये बॅटरी रिक्षा सुरू कराव्यात
माथेरान : येथील हातरिक्षाचालक आजही ब्रिटिशकालीन हातरिक्षा ओढत आहेत. देशाने तंत्रज्ञानात विकास केलेला असूनही आजही माणसाने माणसाला ओढून न्यायच्या हातरिक्षा माथेरानमध्ये आहेत. या अमानवीय प्रथेतून त्यांना मुक्ती मिळवून बॅटरी रिक्षा सुरू कराव्यात, या आशयाचे निवेदन मानवाधिकार कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले. यावेळी लायन्स क्लबचे संजय कांबळे यांच्यासह रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपरिषदेने या संदर्भातील ठराव व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न तथा लक्षवेधी सूचनेद्वारे विधानपरिषदेत उपस्थित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पर्यावरणपूरक अशा बॅटरी ई-रिक्षास मान्यता दर्शविली. हे प्रकरण प्रधान सचिव महसूल शाखा मंत्रालय मुंबई यांच्याकडे आले आहे. राज्य शासन याविषयी गंभीर आहे. कायद्याच्या दृष्टीने हा विषय गुंतागुंतीचा असला तो सुटू शकतो. यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी रायगड या जिल्ह्यातील पर्यटनस्थळावरील हातरिक्षा चालकांच्या मागणीसाठी प्रयत्न करावेत, असेही शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)