पेण : रब्बीच्या जय्यत तयारीनंतर हेटवणे सिंचनाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा अखेर हेटवणे धरण प्राधिकरणाने जलसंपदा विभागाच्या लघू पाटबंधारे विभाग कोलाड यांच्या मागणीनुसार हेटवणे मुख्य कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे हेटवणे लाभक्षेत्रातील ८२५ हेक्टर म्हणजे तब्बल २,००० एकरांवरील पिकांना याचा फायदा झाला आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे.२४ डिसेंबरपासून सिंचनासाठी आरक्षित असलेल्या ८० दलघमी पाण्यापैकी रब्बी हंगामाच्या शेतीच्या पाण्याला हेटवणे मुख्य कालव्यातून पाणी सोडण्यास ग्रीन सिग्नल दिला. यामुळे जानेवारीच्या प्रारंभापासून रब्बी हंगामा अंतर्गत हेटवणे ओलीत परिसरातील शेतकरी कामात गुंतणार आहे. पेणमधील हेटवणे मध्यम प्रकल्पाचे ८० दलघमी पाणी हे शेतीसाठी सिंचनाच पाणी म्हणून आरक्षित आहे. धरणाच्या पायथ्यापासून परिसरात १२ कि.मी. परिघ क्षेत्रात हेटवणे कालव्याच्या पाण्यावरच उन्हाळी भातशेती, भाजीपाला शेती व शेतीपूरक उद्योग व व्यवसायाची मदार आहे. सध्या नगदी पिके म्हणून शेडनेट जरेबेरा, गोंडा, मोगरा, गुलाब, शेवंती या फुलशेतीचे नवे प्रोजेक्ट शेतकऱ्यांनी केले आहेत. याशिवाय आंबा, काजू, फणस, फळबागा, सूर्यफूल शेती , हळद, बटाटे लागवड अशा नवीन पिकांचा प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी अनुभव घेत आहेत. शेतीसाठी हेटवणे कालव्याचे पाणी सोडल्याने शेतकऱ्याला चांगले उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे.पारंपारिक पध्दतीत भातपीक, वेलवर्गीय भाजीपाला शेती व इतर कृषी विद्यापिठाच्या नवनवीन कृषी तंत्रज्ञानावर आधारित पिकांचा समावेश रब्बी हंगामात केला जातो. रब्बीचा हंगाम शंभर टक्के उत्पादनाची हमी देणार फलदायी हंगाम असल्याने उन्हाळी शेतीवर या परिसरातील शेतकरी जास्त मेहनत घेतो. २४ डिसेंबरला १० दिवस उशिराने का होईना शेतीला पाणी मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. (वार्ताहर)
बळीराजाला ‘हेटवणे’चा आधार
By admin | Updated: January 4, 2016 02:04 IST