बँक ग्राहकांचा तिसरा दिवसही रांगेतच
By Admin | Updated: November 13, 2016 01:19 IST2016-11-13T01:19:37+5:302016-11-13T01:19:37+5:30
जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने जनसामान्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे. रोह्यात सर्वच बँकावर गर्दी असून लांबच लांब रांगांमध्ये खातेदारासह ग्राहकांना

बँक ग्राहकांचा तिसरा दिवसही रांगेतच
धाटाव : जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने जनसामान्यांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली आहे. रोह्यात सर्वच बँकावर गर्दी असून लांबच लांब रांगांमध्ये खातेदारासह ग्राहकांना तासन्तास उभे राहवे लागत आहे. नोटा बंद झाल्यापासून तिसऱ्या दिवशी, शनिवारीही ग्राहक मोठ्या संख्येने रांगेत उभे दिसले. परिसरातील एटीएम अद्याप सुरू न झाल्याने खातेदारही प्रतीक्षेत आहेत.
जुन्या नोटा बदलण्यासाठी खातेदारांसह ग्राहकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणवर्गाचा सहभाग अधिक असून सुट्या पैशांच्या कमतरतेमुळे पैसे बदलून मिळण्यास विलंब लागत आहे.
बँकेतील इतर सेवांकरिता नेट नसल्यामुळे व्यवहारात खंड पडत आहे. पैसा नसल्याने अनेकांनी वीकएण्डला बाहेरगावी जाणे टाळले आहे. दोन-चार दिवसांत बँकामधील गर्दी कमी होईल, असे रोह्यातील एका बँकेच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले असले तरी कामगारवर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. आर्थिक व्यवहार ठंडावल्याने बाजारातील दुकाने ओस पडली आहेत. एटीएम सेवा सुरू केल्यास थोडीफार गैरसोय दूर होईल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेर गर्दी
तळे : नोटा बदलून घेण्यासाठी तिसऱ्या दिवशीही बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक, पोस्ट आॅफिस बाहेर नागरिकांनी एकच गर्दी केलेली पाहावयास मिळत आहे.
दैनंदिन व्यवहार कसे करावयाचे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. नागरिकांकडे सुटे पैसे १००/५० रु. नोटाच नसल्यामुळे दैनंदिन व्यवहार करणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया मनोज वाढवळ व महेंद्र बिरवाडकर या नागरिकांनी दिली. एसटीने प्रवास करावयाचा म्हटले तरी ग्रामीण भागातील नागरिकांकडे सुटे पैसे नाहीत. बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्याही घटली आहे.
शहरात तीन दिवसांपासून एटीएम सेवा बंद असल्यामुळे बहुतांश आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. पैसे असूनही बजेट कोलमडल्याची गृहिणींची स्थिती झाल्याची प्रतिक्रिया सुजाता पवार यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना बँक व्यवहाराबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. पैसे काढण्यापेक्षा अधिक वेळ पैसे जमा करण्यास लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.