खराब हवामानामुळे पर्यटन व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 02:00 IST2019-11-03T01:59:54+5:302019-11-03T02:00:22+5:30
मंदीचे सावट। मुरुडमध्ये असंख्य जोडधंदे तोट्यात

खराब हवामानामुळे पर्यटन व्यवसायाला फटका
मुरुड : तालुक्यात आजतागत ४,५०० मिलीमीटर पाऊस पडला असून खराब हवामानामुळे पर्यटन व मासळी व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला असून संबंधित जोड उद्योगांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, सुट्टीचा हंगाम तसेच वीकेण्ड असतानाही पर्यटक मुरुडमध्ये दाखल झालेले नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकच नसल्याने घोडागाडीचा व्यवसाय मंदावला आहे.
हवामान बदलल्यामुळे जंजिरा किल्ल्यावरील जलप्रवास बंद करावा लागत आहे, तर वादळी हवामानात खोल समुद्रात गेलेल्या होड्या पुन्हा किनाºयाला येत आहेत. मासळी मिळत नसल्याने हा व्यवसायही मंदावला आहे. जंजिरा किल्ल्यात पर्यटक नसल्याने शिडाच्या बोटीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही पुरेसा रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. ऐन हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरुड व काशीद या दोन ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे हॉटेल व लॉजिंग व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ऐन दिवाळी हंगामात पावसाच्या तडाख्यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण शेतात आलेले उभे पीक पावसामुळे भिजल्याने शेतकºयाचे अतोनात नुकसान झाले आहे.