आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
By Admin | Updated: September 5, 2015 03:05 IST2015-09-05T03:05:45+5:302015-09-05T03:05:45+5:30
पेण येथील आदिवासी उपयोजनेच्या प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्या बदलीच्या आणि आदिवासी वसतिगृहासंबंधी विविध मागण्यांसाठी नेरळ येथे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
नेरळ : पेण येथील आदिवासी उपयोजनेच्या प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांच्या बदलीच्या आणि आदिवासी वसतिगृहासंबंधी विविध मागण्यांसाठी नेरळ येथे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारपासून उपोषण सुरू केले होते. मात्र कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची समजूत काढण्यात यश आल्याने मध्यरात्री ११ वाजता त्यांनी उपोषण मागे घेतले. तेथील अनेक विद्यार्थी शुक्रवारी सकाळी कॉलेजला रवाना झाल्याची माहिती तेथील गृहपाल सालवे यांनी दिली.
पेण येथील आदिवासी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांबाबत तेथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले म्हणून जिल्ह्यात आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर कर्जत आणि नेरळ येथील आदिवासी वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले. नेरळमधील ४० विद्यार्थी उपोषण करण्यासाठी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुपारी बसले. रात्री ही माहिती कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी वसतिगृहात जाऊन उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
संघटनेचे पदाधिकारी सुनील पारधी, दत्ता निरगुडा, जैतू पारधी, सुनील हिंदोला यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत स्थानिक आमदार सुरेश लाड आणि शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी राज्य सरकारच्या संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि शासन यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री सर्व विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले. (वार्ताहर)