कर्जत तालुक्यातील नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:03 IST2019-12-17T23:02:21+5:302019-12-17T23:03:36+5:30
वनविभागाची मूक संमती : इमारती बांधण्यासाठी वृक्षतोड; ग्रामपंचायतीची परवानगी नाही

कर्जत तालुक्यातील नेरळच्या खांडा भागात झाडांवर कुऱ्हाड
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील नेरळ गावात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून काँक्रीटचे जंगल बनविले जात आहे. त्यासाठी झाडेही मुळासकट तोडली जात आहेत. नेरळच्या खांडा भागात वनविभागाच्या कार्यालयाच्या बाजूला इमारती बांधण्यासाठी त्या जागेत असलेली झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वनविभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत असून, नेरळ ग्रामपंचायतने अद्याप त्या जागेवर इमारत बांधण्यास परवानगी दिली नाही; परंतु खोदकाम सुरू आहे.
नेरळ गावातील खांडा भागात इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे तेथे असलेली झाडे इमारत बांधण्यास अडथळा ठरत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडे जागेच्या मालकाने झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ग्रामपंचायतने वनविभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले. या जागेपासून हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय असून, त्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी हे दररोज चार वेळा ये-जा करीत असतात. त्या जागेतील १०० वर्षे जुनी झाडे कटर मशिन लावून तोडली जात आहेत. त्या जागेतील झाडे तोडण्याचे काम लाकूडतोडे गेली आठवडाभर करीत असून त्यांचे काम आणखी आठ-दहा दिवस चालणार आहे. मात्र, ठेकेदार असलेल्या झाडे तोडणाऱ्याला वनविभागाचे कार्यालय त्या झाडांपासून ९० मीटर अंतरावर असूनदेखील कोणतीही भीती नाही.
याबद्दल नेरळ ग्रामपंचायतीकडे चौकशी केली असता कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी आम्ही दिली नाही. त्या जागेचे मालक अल्ताफ मुजेद यांचा बांधकाम परवानगीसाठी अर्ज आला आहे. मात्र, अद्याप त्या जागेवर बांधकाम परवानगी दिली नाही, असे सांगण्यात आले.
आमच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेतील झाडे ही इंजायली आहेत, त्यामुळे त्यांचे महत्त्व वनविभागात नाही. त्यांनी आमच्या कार्यालयाकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती, त्यांना परवानगी दिली असून त्यासाठी कोणतेही दंड आकारले नाही.
- नारायण राठोड, वन अधिकारी
वनविभाग स्थानिकांनी घरात सरपण म्हणून सुकलेले झाड तोडले तरी लगेच पोहोचतात. मात्र, त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला झाडे तोडूनदेखील वनविभाग काही करीत नाही याचे आश्चर्य वाटते. दुसरीकडे त्यासाठी कोणताही दंड आकारला नाही.
- संजय अभंगे, सामाजिक कार्यकर्ते
आमच्याकडे अर्ज आला आहे. मात्र, आम्ही आधी वनविभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले आहे. त्यांना बांधकाम परवानगी दिली नाही. मात्र, खोदकाम सुरू केले असल्यास आमचे पथक त्या जागेवर जाऊन माहिती घेईल.
- संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी