Awaliya of landscape painting, watercolor painting | निसर्गचित्र, जलरंग पेंटिंगचा अवलिया; जलरंगाचा वापर करून काढली ३०० हून अधिक चित्रे

निसर्गचित्र, जलरंग पेंटिंगचा अवलिया; जलरंगाचा वापर करून काढली ३०० हून अधिक चित्रे

उरण : महाराष्ट्रात जलरंगांत काम करण्याची मोठी परंपरा आहे. जलरंगात दर्जेदार निसर्ग चित्र आणि प्रसंग चित्रांकरिता अनेक चित्रकार प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये आता उरण तालुक्यातील बंदरपाडा-करंजा येथील २१ वर्षीय दीपेश पांचाळ या युवा कलाकाराची भर पडली आहे. देशभरातील विविध प्रदर्शित पेंटिंग्ज प्रदर्शनात त्याच्या जलरंग माध्यमातील अनेक निसर्ग चित्रांना दाद मिळाली आहे. दिपेश सध्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.

सुतारकाम करणाऱ्या दीपेशच्या आई-वडिलांचे गणपतीपुळे हे मूळ गाव. रोजगारानिमित्त २५-३० वर्षांपूर्वी त्यांनी उरण तालुक्यातील करंजा गाव गाठले. दीपेशला लहानपणापासूनच निसर्ग चित्र काढण्याची आवड होती. त्याचे काका गणपतीच्या मूर्ती बनवायचे, दीपेशही रंगकामात सहभागी व्हायचा. तसेच जलरंगाच्या माध्यमातून निसर्ग चित्र काढायचा. त्याच्या आई-वडिलांसह काकांनी त्याला सातत्याने प्रोत्साहित केले. 

सुरुवातीच्या काळात दृश्य तपशील चितारण्यावर त्याचा भर होता. त्यानंतर जलरंगांचा मुक्त वापर त्याच्या चित्रांत दिसू लागला. जलरंग चित्रकला करिअर म्हणून निवडलेल्या दीपेशचे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन शास्त्र-शुद्ध पध्दतीने शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. महाराष्ट्रातून स्कल्चर मॉडेलिंग या विभागासाठी फक्त ११ जागा असतात. या वर्षी महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावून या विभागात प्रवेश मिळविला आहे. या संधीचे सोने करणार असल्याचे दीपेशने सांगितले.

दीपेशने आतापर्यंत ३०० हून अधिक निसर्ग चित्र जलरंगांचा मुक्त वापर करुन काढली आहेत. विशेषत: स्थानिक मच्छीमारांच्या जीवनावर रेखाटण्यात आलेल्या चित्रांनी वाहवा मिळवली आहे. २०१८ मध्ये अमृतसर येथे भरविण्यात आलेल्या ८४ व्या अखिल भारतीय प्रदर्शनामध्येही दीपेशची जलरंगातील निसर्ग चित्र ठेवण्यात आली होती. आर्ट ऑफ प्लाझा बाहेर भरविण्यात आलेल्या निवडक चित्र प्रदर्शनालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. जे.के.अ‍ॅकेडमी ऑफ आर्ट्स अँड डिझाईन, राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन, परिवर्तन,भारत स्कूल ऑफ आर्ट्स आदी ठिकाणी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या दीपेशला पारितोषिके मिळाली आहेत.
 

Web Title: Awaliya of landscape painting, watercolor painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.