Avoid the historic Shiv Smarak in Uran due to lockdown | उरणमधल्या ऐतिहासिक शिवस्मारकाला लॉकडाऊनमुळे टाळे

उरणमधल्या ऐतिहासिक शिवस्मारकाला लॉकडाऊनमुळे टाळे

मधुकर ठाकूर

उरण : उरण येथे जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे बहुचर्चित मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचे पाच महिन्यांपूर्वीच लोकार्पण झाले आहे. मनोरंजनासह विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक भव्य- दिव्य स्मारकाची मागील तीन वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिक आदी सर्वांनाच मोठी प्रतीक्षा लागून राहिली होती. २० मीटर उंचीच्या शिवस्मारक अखेर लोकांना मोफत पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ३२ कोटी खर्चून उभारण्यात आलेले शिवस्मारक टाळेबंदीत ठेवण्याची पाळी जेएनपीटीवर आली आहे.

उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटादरम्यान नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात जेएनपीटीने ३२ कोटी खर्चून २० मीटर उंचीचे भव्य शिवस्मारक उभारले आहे. पाच मजले उंचीपर्यंत उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या तळमजल्यावर ४८० चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे. या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरूम आणि संग्रहालयाचाही समावेश आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असून या बाल्कनीमधून चहुबाजूंनी असलेल्या निसर्गमय परिसर न्याहाळता येणार आहे. दुसऱ्या मजल्यावर भव्य अशा एक्झिबिशन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या एक्झिबिशन हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यामुळे कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाºया स्वातंत्रवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगावर आधारित अप्रतिम शिल्प उभारण्यात आले आहे, तसेच यामध्ये दि.बा.पाटील यांचेही लढ्याच्या प्रसंगावर आधारित चित्रही लावण्यात आले आहे.

तिसºया आणि चौथ्या मजल्यावर चहुबाजूंनी परिसरातील देखाव्यांची लज्जत घेण्यासाठी विह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर तयार करण्यात आलेल्या आॅडिओ व्हिज्युअल सीस्टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. या आॅडिओ व्हिज्युअल मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे. या खुल्या एमपी थिएटरमध्ये २५० प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
पाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातूंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पर्यटकांसह सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू पाहाणाºया शिवस्मारकाचे लोकार्पण मार्च, २०२० मध्येच केले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे हे शिवस्मारक बंद ठेवण्याची पाळी जेएनपीटीवर आली आहे.

मोठ्या उंचीचे एकमेव स्मारक
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमजल्यापासून उंची १९.३ मीटर आहे. राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक आहे. तत्कालीन जेएनपीटी ट्रस्टी आणि विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे ते उदयास आले आहे. १७ फेब्रुवारी, २०१९ रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात
आले.

Web Title: Avoid the historic Shiv Smarak in Uran due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.