‘कर्नाळा’च्या विकासासाठी प्रयत्नशील
By Admin | Updated: March 3, 2016 02:42 IST2016-03-03T02:42:57+5:302016-03-03T02:42:57+5:30
पनवेलला लागून असलेल्या माथेरान, कर्नाळा आणि भीमाशंकर या परिसराचा विकास करण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे.

‘कर्नाळा’च्या विकासासाठी प्रयत्नशील
पनवेल : पनवेलला लागून असलेल्या माथेरान, कर्नाळा आणि भीमाशंकर या परिसराचा विकास करण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. वनासंदर्भातील कायदे अतिशय कडक आहेत. त्या कायद्याचे पालन करून कर्नाळा अभयारण्याचा विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर माथेरान रोपवे व पनवेलहून भीमाशंकरला जाण्याकरिता मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता शासन अनुकूल निर्णय घेणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
पनवेल शहरातील मुख्य चार रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एकूण ४३ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कामासाठी एमएमआरडीएने निधी दिला आहे. आगामी काळात पायाभूत सुविधांकरिता पनवेल शहराला निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. ठाणा नाका, उरण नाका ते टपाल नाका, विश्राळी नाका या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. आ. प्रशांत ठाकूर या भागाच्या विकासाकरिता सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात पनवेलकरिता निधीची कमरता पडून दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, महेश बालदी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)