आर्चरीमध्ये आर्यनची आॅस्ट्रेलियात गरुडझेप
By Admin | Updated: October 14, 2016 06:45 IST2016-10-14T06:45:02+5:302016-10-14T06:45:02+5:30
आॅस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरणमधील १५ वर्षीय आर्यन पाटीलने

आर्चरीमध्ये आर्यनची आॅस्ट्रेलियात गरुडझेप
उरण : आॅस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत उरणमधील १५ वर्षीय आर्यन पाटीलने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. आता त्याचे लक्ष्य आॅलिम्पिंकमध्ये सहभागी होण्याचे असून, त्यासाठी त्याने कसून सरावात सुरुवात केली आहे.
उरण तालुक्यातील जसखार गावात राहणारा आर्यन पाटील खारघर येथील इंटरनॅशनल फ्रुंडन्ट स्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. आर्चरीची आवड असलेल्या आर्यनने तीन वर्षांपासून सराव आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून दर्जेदार खेळाचा ठसा उमटविला आहे. सिंगल स्पॉट, फाईव्ह स्पॉट, मिक्स स्पॉट आदी विविध स्पर्धांमध्ये त्याने अनेक मेडल पटकावली आहेत. जिल्हास्तरीय विविध स्पर्धांत १० गोल्ड मेडल जिंकली आहेत. २०१५ साली पाँडेचरीमध्ये आयोजित नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत ६५० स्पर्धकांमध्ये आर्यनने चमकदार कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकावले. त्याआधी त्याने मुंबई मेयर स्पर्धेत विविध गटातून ५ रौप्य पदकांची कमाई केली आहे. सोलापूर, कोल्हापूर येथे २०१४ मध्ये राज्यस्तरीत आर्चरी स्पर्धेतही आर्यनने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. मुंबई येथे २०१६ मध्ये आयोजित स्पर्धेतही आर्यनने विविध गटातून ५ रौप्य पदके पटकाविली आहेत. वर्ल्ड फिल्ड असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाषचंद्र नायर आणि प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनचा सराव सुरु आहे. मुंबईतील प्रबोधन जिमखान्यात आर्यनचा मागील तीन वर्षांपासून कसून सराव सुरु आहे. जिल्हा, राज्य आणि नॅशनल स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांची लयलूट करणाऱ्या आर्यनची आस्ट्रेलियातील वॉगा - वॉगा येथे २५-३० सप्टेंबर २०१६ दरम्यान वर्ल्ड फिल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती. सातासमुद्रापार आयोजित स्पर्धेत १८ देशातील ५५० स्पर्धक सहभागी झाले होते. कुमार गटासाठी आयोजित या स्पर्धेसाठी भारतातून आर्यन पाटील (उरण) आणि सौरभ मोरे (रोहा - रायगड) या दोन स्पर्धकांची निवड झाली होती.
आर्यनवर त्याच्या असंख्य चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. वयाच्या अवघ्या पंधरा वर्षात आर्चरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या आर्यन पाटील याला आतापासूनच आगामी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्याने सुभाषचंद्र नायर आणि प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षकांच्या मदतीने आतापासूनच जोरदार सरावाची सुरुवात केली आहे. पुढील वर्षात मार्च २०१७ मध्ये अंडर १९ वर्षीय वयोगटात रुमानियात आर्चरी चॅम्पियन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतही आर्यन सहभागी होणार आहे.
(वार्ताहर)