पोलिसांचा ‘बडी कॉप’ ठरतोय देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:08 IST2020-02-14T00:08:05+5:302020-02-14T00:08:08+5:30

हरविलेली लहान मुले-मुली, महिलांना मदत : पाच जणांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात यश

Angels are becoming the 'big cop' of the police | पोलिसांचा ‘बडी कॉप’ ठरतोय देवदूत

पोलिसांचा ‘बडी कॉप’ ठरतोय देवदूत

निखिल म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यातील हरविलेली लहान मुले-मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नव्याने सुरू केलेला ‘बडी कॉप’ विभाग देवदूत ठरत आहे. डिसेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे हरविलेल्या पाच जणांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात यश आले आहे.


रायगड जिल्ह्यात तब्बल २७ पोलीस ठाणे आहेत. त्या ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे नोंद होणे सुुरूच असते. संबंधित गुन्ह्यांतील आरोपींना चांगली अद्दल घडावी यासाठी पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना न्यायदेवतेच्या समोर गुडघे टेकायला भाग पाडण्याचे काम करीत असतात. समाजामध्ये कायदा व सुव्यस्था राखण्याचे काम पोलिसांना करावे लागते; त्याचप्रमाणे समाजोपयोगी कामही त्यांच्यामार्फत होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने हरविलेल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नातेवाइकांकडे सुपुर्द करणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांना पूर्ण करावी लागते. यातील विशेष बाब म्हणजे हरविलेल्या मुलांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश असल्याने तो विषय अतिशय संवेदनशील पद्धतीने त्यांना हाताळावा लागतो. घरातून पळून जाणारे तसेच लहान मुले हरविण्याच्या तक्रारी वाढत असल्याने रायगड पोलिसांनी ‘बडी कॉप’ हा उपक्रम सुरू केला आहे.


रायगड जिल्ह्यातील गोरेगाव बस स्थानकात १४ वर्षांची मुलगी रडत असल्याची माहिती एसटी नियंत्रकाने संबंधित पोलीस ठाण्यात फोन करून कळविली होती. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार टेमकर, महिला पोलीस नाईक गोसावी यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलीला ताब्यात घेतले. तिच्या समस्या समजावून घेतल्या. पीडित मुलगी जीयांशी पाडेकर हिचे वडील तिला दारू पिऊन मारझोड करीत असत, या रोजच्या त्रासाला कंटाळून ती घरून निघाली. मात्र तिच्या आजोबांच्या गावचे नाव लक्षात नसल्याने ती कावरीबावरी झाली. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला सुव्यवस्थित वडिलांच्या घरी सोडले. तर पेण बाजारपेठेमध्ये पाच वर्षांचा रितेशकुमार महतो हा रडत असल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले. त्याची विचारपूस करून ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार घरत यांना बोलावून घडलेली परिस्थिती सांगितली. या महिला पोलीस हवालदाराने रितेशकुमार यास त्याच्या वडिलांजवळ पोहोचविले.


महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशन हद्दीत बडी कॉप महिला पोलीस कर्मचारी जांभरे व कोल्हापुरे गस्त घालत असताना रूपाली सावंत ही आपल्या लहान मुलास घेऊन रडत बसलेली दिसली. तेव्हा चौकशी के ली असता पतीबरोबर वाद झाल्याने घर सोडल्याचे सांगितले. महिला पोलिसांनी तिच्या पतीस घटनास्थळी बोलावून दोघांची समजूत काढत पुन्हा त्यांना एकत्र आणले. तर रस्ता चुकलेल्या ११ वर्षीय अश्विनी मंगेश घाडगे हिला तिच्या आई-वडिलांकडे सोडण्यात यश आले.

रेवदंडा येथील हरवलेली महिला सापडली
रेवदंडा येथील सुरेखा वाघमारे खोपोलीला आपल्या बहिणीकडे जाते असे सांगून निघून गेल्या. मात्र चौकशी केली असता त्या खोपोलीमध्ये पोहोेचल्या नसल्याचे नातेवाइकांकडून समजले. त्यानंतर वनिता वाघमारे यांनी आपली वहिनी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून बडी कॉप कर्मचारी मोकल व भोईर या गस्त घालत असताना सुरेखा सापडल्या. सुरेखाला त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले.

काय आहे बडी कॉप्स
या उपक्र मातून पोलीस थेट महिला व मुलींच्या मदतीसाठी जाणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या तक्र ारी नोंदवून घेणार आहेत.
तसेच मुलींचे व महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार करण्यात येणार आहेत. त्यातून छेडछाड, लैंगिक गुन्हे कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. इतकेच नव्हेतर, पोलीस-नागरिक संवादही वाढविण्यात येणार आहे.

शहराच्या एखाद्या भागात महिलेवर काही प्रसंग ओढावल्यास ती तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकते. ती तक्रार बडी कॉप विभागाकडील पोलीस कर्मचाऱ्यांकडे जाईल. कर्तव्य बजावित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पीडितेला मदत करतील. कोणत्याही परिस्थितीत महिलेच्या तक्र ारीचे निवारण करण्याच्या सूचना त्या महिला पोलीस कर्मचाºयांना दिल्या आहेत.
- अनिल पारसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड

Web Title: Angels are becoming the 'big cop' of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.