ऑलकार्गो कामगारांचा रास्ता रोकोचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 03:45 IST2019-02-20T03:45:06+5:302019-02-20T03:45:39+5:30
पत्रकार परिषदेत माहिती : प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच; कंपनी व्यवस्थापनाबद्दल नाराजी

ऑलकार्गो कामगारांचा रास्ता रोकोचा इशारा
उरण : येथील ऑलकार्गो व्यवस्थापनाने पोलीस, तहसीलदार यांच्या मध्यस्थीचा लाभ उठवित उपोषण करणाऱ्या कामगारांची फसवणूक केली आहे. कंपनी प्रशासनाने २० फेब्रुवारीपर्यंत कामगारांच्या मागण्यांबाबत आश्वासनानंतरही चालढकल करण्यात येत आहे. कामगार प्रश्नावर आणखी विलंब केल्यास कामगार, प्रकल्पग्रस्त, महिला आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बुधवारपासून कंपनीसमोरच बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा कामगार नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीतील १३१ कामगारांना अचानक कामावरून कमी केले आहे. या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे याकरिता ६ फेब्रुवारीपासून कंपनीच्या गेटसमोर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. भूमिपुत्र शेतकरी संघर्ष समिती ही कामगार संघटना येथे कार्यरत असून हे आंदोलन प्रकल्पग्रस्त कामगार, स्थानिक कामगार व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने सुरू आहे. एसीपी विठ्ठल दामगुडे यांच्या मध्यस्थीने कंपनीच्या दुय्यम अधिकाºयांसोबत दोन बैठका झाल्या. या बैठकीमध्ये आ. बाळाराम पाटील, माजी आ. विवेक पाटील आणि मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कंपनीचे अधिकारी प्रकाश तुलशीयानी व वसंत शेट्टी यांनी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले, मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय कंपनी प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. कंपनीचे अधिकारी हे पोलीस अधिकारी व सर्वपक्षीय प्रतिनिधी यांची दिशाभूल करीत आहेत हे आजपर्यंतच्या कंपनीच्या व्यवहारावरून दिसून आले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगार, स्थानिक कामगार व विविध पक्षाचे प्रतिनिधी यांनी एकमताने ठरविले आहे की जर कंपनीने आश्वासनाप्रमाणे सकारात्मक निर्णय दिला नाही तर कंपनीच्या गेटसमोरच बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान, यावेळी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, मनसे उरण शहराध्यक्ष जयंत गांगण आदी उपस्थित होते.