रस्त्यांमुळे अलिबागकर त्रस्त
By Admin | Updated: April 26, 2017 00:31 IST2017-04-26T00:31:13+5:302017-04-26T00:31:13+5:30
बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे.

रस्त्यांमुळे अलिबागकर त्रस्त
अलिबाग : बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्तीसंदर्भात सातत्याने निवेदन देऊनही त्याकडे लक्ष नसल्याने अलिबाग तालुक्यातील जनता आता संतप्त झाली आहे. २९ एप्रिल रोजी अलिबाग-रेवस व कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड या मार्गावर असलेल्या आरसीएफ गेट वायशेत येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्थेने अलिबाग येथील अधिकाऱ्यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व मिनीडोर चालक मालक कल्याणकारी संस्था अलिबागचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर हे करणार आहेत.
अलिबागला जोडणाऱ्या चारपैकी तीन मुख्य रस्त्यांची धूळधाण झाली आहे. सगळीकडे फक्त खड्डे आणि खड्डेच पडलेले आहेत. गेल्या पावसाळ्यातले ते दिवस आठवून अजूनही प्रवाशांच्या पोटात गोळा येतो. पावसाळा जवळ येतो आहे, तशी लोकांची अस्वस्थता वाढत आहे. रस्त्यांबाबत बोलायला कोणीही तयार नाही. यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येत्या २९ एप्रिल रोजी जनता रस्त्यावर उतरण्याच्या बेतात आहे. अशा आशयाचे निवेदन मंगळवारी मिनीडोर संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. मात्र त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागेवर नव्हते.
अलिबाग-रोहा रस्ता, अलिबाग-रेवदंडा रस्ता, अलिबाग-रेवस रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. मिनीडोर, रिक्षा,एसटी प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवासकरण्या सारखे आहे. दुचाकीस्वारांना तर जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीस अपघात झाल्याचा घटना घडल्या आहे. विशेषत: महिलांना अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाला जाग येत नाही,अशी खंतही व्यक्त केली जात आहे.
अधिकारी आणि राजकारणी ठेकेदार यांच्यात सामान्य जनतेचे मात्र हाल सुरू आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना काही देणे-घेणे नसल्याचे समोर येत आहे. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे रायगडात असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे या पावसापूर्वी तरी आपले रस्ते नीट होतील ना? याबाबत जनता साशंक आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर रस्ते चांगले होतील असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मात्र हा पावसाळा आला तरी अजून परिस्थिती तशीच आहे. (प्रतिनिधी)