तरुणाची कमाल! अवघ्या अर्धा तासात मोटार सायकलवर सर केलाकनकेश्वर डोंगर
By राजेश भोस्तेकर | Updated: February 5, 2024 16:59 IST2024-02-05T16:54:26+5:302024-02-05T16:59:17+5:30
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिर हे पुरातन असून १२०० फूट उंचीवर वसले आहे.

तरुणाची कमाल! अवघ्या अर्धा तासात मोटार सायकलवर सर केलाकनकेश्वर डोंगर
राजेश भोस्तेकर ,अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर मंदिर हे पुरातन असून १२०० फूट उंचीवर वसले आहे. या मंदिरात जाण्यासाठी पायी पायऱ्या चढत जावे लागते. वाहन घेऊन जाण्यासाठी पर्याय नसल्याने भाविक हे पायीच चढून जातात. असे असले तरी सातीर्जे गावातील २३ वर्षीय साहिल वामन निर्गुण या तरुणाने रविवारी ४ फेब्रुवारी रोजी आपली मोटार सायकल चालवत अर्धा तासात कनकेश्वर डोंगर चढून मंदिर परिसरात पोहचला आहे. पंधरा वर्षांनंतर साहिल हा मोटार सायकल पायऱ्या द्वारे चालवत पोहचणारा दुसरा स्वार ठरला आहे.
कनकेश्वर डोंगरावर श्री महादेवाचे पुरातन निसर्गाने नटलेला मंदिर आहे. लाखो भाविक कनकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. कनकेश्वर मंदिरात जाण्यासाठी साडे सहाशे पायऱ्या आणि काही ठिकाणी पायवाट आहे. पायी मंदिरात जाण्यासाठी दीड दोन तास लागतात. श्रावणात कनकेश्वरला जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी याठिकाणी उसळली जाते. कनकेश्वर येथे मंदिरात येणाऱ्यासह ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्याही अधिक असते.
अलिबाग तालुक्यातील सातिर्जे गावातील साहिल वामन निर्गुण हा व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक आहे. तसेच साहिल हा बायकर असून अनेक ठिकाणी ट्रेकिंगला जात असतो. अनेक दिवसापासून कनकेश्वर डोंगर मोटार सायकलद्वारे चढून जाण्याचे स्वप्न होते. त्यादृष्टीने साहिल याने हिरो होंडा मोटार सायकल मोडीफाय करून घेतली होती. रविवारी ४ फेब्रुवारी रोजी साहिल याने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पायथ्यापासून मोटार सायकल पायऱ्यावरून चालविण्यास सुरुवात केली. तीस ते चाळीस मिनिटात साहिल हा मोटार सायकलने कनकेश्वर मंदिर परिसरात सुखरूप पोहचला.
कनकेश्वर डोंगर मोटार सायकलद्वारे याआधी पंधरा वर्षापूर्वी चोंढी येथील दिलीप अनंत मांजरेकर याने सर केला होता. त्यानंतर साहिल याने मोटार सायकल द्वारे हा डोंगर सर करून दुसरा ठरला आहे.