अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली
By निखिल म्हात्रे | Updated: December 1, 2023 17:44 IST2023-12-01T17:44:36+5:302023-12-01T17:44:43+5:30
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही

अलिबाग पालिकेचे कचरा प्रक्रिया केंद्र बंद; कांदळवनाची घुसमट थांबवली
अलिबाग - कचऱ्याच्या डोंगरामध्ये कांदळवनाची होणारी घुसमट थांबवण्यासाठी अलिबाग नगरपालिकेने सुका कचरा प्रक्रिया केंद्र मंजूर केले, यासाठी कोट्यवधींची अद्यावत यंत्रसामुग्री मागवण्यात आली, मात्र वर्ष उलटले तरी ही यंत्रसामुग्री वापराविना पडून आहे. त्यावरील आवरणही अद्याप काढलेले नाही. असे असताना केंद्र कार्यान्वित असल्याचा दावा नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया केंद्र सुरू होते, मात्र त्यानंतर वर्षभरापासून कचऱ्यावर काहीही प्रक्रिया झालेली नाही. कचऱ्याचे जे गट्टे आहेत, ते जुने आहेत. एमएसईबीने ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठाही अद्याप सुरू केलेला नाही. नव्याने आणलेली यंत्रसामुग्री योग्य ठिकाणी कार्यान्वितही केलेली नाही, असे असताना अलिबाग नगरपालिकेने हे केंद्र सुरू असल्याचा दावा केला आहे. अलिबाग नगरपालिकेच्या या माहितीने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रक्रिया केंद्रात सुक्या कचऱ्यातून काच, धातू, प्लास्टिकसारख्या वस्तू वेगळ्या केल्या जाणार आहेत. तीन ऑपरेटर आणि कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र चालवले जाणार आहेत.
अनेक दिवसांपासून कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रे सुरू झालेले नाहीत. घनकचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे अलिबागमधील नागरिक त्रस्त आहेत. नगरपालिका आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतींसाठी एकच डम्पिंग ग्राऊंड आहे. चेंढरे, वेश्वी, वरसोली या ग्रामपंचायतींची लोकवस्तीही मोठी आहे, परंतु त्यांना स्वतःचे डंम्पिग ग्राऊंड नसल्याने त्या ग्रामपंचायतीही जमा केलेल्या कचरा अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकतात. त्यामुळे दिवसाला शेकडो टन कचऱ्याचे डोंगर उभे राहतात.
डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला कांदळवन आहेत. कचऱ्याला आग लागण्याच्या घटना अलिबागमध्ये अनेकदा घडल्या आहेत. आगीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण वाढत असून आरोग्याच्या व्याधी बळावत आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अलिबाग नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर अन्य तीन ग्रामपंचायतींचा कचरा जमा होतो. यासाठी संयुक्त डम्पिंग ग्राऊंडची मागणी सात वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे. या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे; मात्र योग्य अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी सुका कचरा प्रक्रिया केंद्र एक वर्षापूर्वीच सुरू झाले. नव्याने या ठिकाणी काही यंत्र आणली आहेत. त्यांच्यासाठी ७५ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा करावा लागणार असून एमएसईबीचे अधिकारी लवकरच ते बसवून देणार आहेत.- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका